S M L

आरोपींना कडक शिक्षा द्या, आगे कुटुंबीयांची मागणी

Sachin Salve | Updated On: May 3, 2014 03:25 PM IST

आरोपींना कडक शिक्षा द्या, आगे कुटुंबीयांची मागणी

aage_family_meetncp03 मे : महाराष्ट्र दिनाच्या दोन दिवसाअगोदर अहमदनगरमध्ये घडलेल्या दलित तरुणाच्या हत्याकांडाने संयुक्त महाराष्ट्राला एकच हादरा बसला. पुरोगामी महाराष्ट्राचा ठेंभा मिरवणार्‍या राज्यात एका दलित तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलीय.

नगर जिल्हयात जामखेड तालुक्यातल्या खर्डा गावात नितीन आगे या तरुणाची 28 एप्रिलला अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. शाळेतल्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या आरोपावरुन ही हत्या करण्यात आली असा आरोप आगे कुटुंबीयांनी केलाय. यासंदर्भात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहेत. या 11 जणांवर खुनाचा आणि ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींमध्ये गावातील घोलेकर कुटुंबातले सदस्य आणि काही स्थानिक ज्यांनी हा गुन्हा करण्यात मदत केली अशांचाही समावेश आहे.

नितीनला शाळेतून बाहेर काढून मारहाण करण्यात आली असा आरोप नितीनच्या कुटुंबीयांनी केला आहे. पण नितीनच्या शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब ढोबे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. नितीन 24 तारखेनंतर शाळेत आलेलाच नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. आज यासंदर्भात पालकमंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे आमदार जयदेव गायकवाड यांनी ही कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी सरकार आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कोसळलेली कायदा-सुव्यवस्था- बधीर झालेली राजकीय संवेदनशीलता आणि समाजाचा न राहिलेला धाक या कारणांमुळे खर्डा गावात ही घटना घडलीये, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केलंय. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात दलितांवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे हे थांबणार कधी ? आम्हाला योग्य न्याय कधी मिळणार ? असा सवाल आगे कुटुंबीय विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2014 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close