S M L

पुन्हा नगर, दलित महिलेचा अंत्यविधी रोखला !

Sachin Salve | Updated On: May 3, 2014 04:46 PM IST

पुन्हा नगर, दलित महिलेचा अंत्यविधी रोखला !

shri_gondi03 मे : अहमदनगरमध्ये नितीन आगे हत्याकांडाला काही दिवस उलटत नाही तोच माणुसकीला काळीमा फासणारी आणखी एक घटना घडली आहे. नगरच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या चिंभळा येथे सवर्ण गावकर्‍यांनी एका दलित महिलेचा अंत्यविधी रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय.

स्मशानभूमीच्या वादावरुन अंत्यविधी रोखण्यात आलाय. यामुळे दलित विरुद्ध सवर्ण असा संघर्ष पेटला. चिंभळा गावातील दलितांनी मृत महिलेचं पार्थिव स्मशानभूमीतच ठेवून सकाळपासून रास्तारोको केला. अखेर दुपारी आमदार बबनराव पाचपुते यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि दुपारी अत्यंसस्कार करण्यात आले.

अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात चिंभळा गावातील रहिवासी लक्ष्मीबाई आढागळे या 80 वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास मृत्यू झाला. आढागळे यांच्या नातेवाईकांनी अत्यंसंस्कारची तयारी सुरू केली यासाठी सकाळी स्मशानभूमीत लाकडे नेऊन टाकली. काही वेळानंतर अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहचली असता आजूबाजूच्या सवर्ण गावकर्‍यांनी अंत्यविधी करण्यास रोखले. हे गावकरी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी अंत्यविधीसाठी आणलेल्या साहित्याची नासधूस करण्यास सुरुवात केली. नेहमीच्या या त्रासाला कंटाळलेल्या दलित गावकर्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आणि पार्थिव स्मशानभूमीतच ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं.

पार्थिवाची विटंबना आणि अंत्यविधीच्या साहित्याची नासधूस करणार्‍या गावगुंडांना त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी गावकर्‍यांनी केली. दत्तू गायकवाड, विश्वनाथ गायकवाड, अशोक गायकवाड, दीपक गायकवाड, संभाजी गायकवाड, संपतकाका गायकवाड यांनी अंत्यविधीच्या साहित्याची नासधूस केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. श्रीगोंदीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर आमदार बबनराव पाचपुते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि दलितांसाठी वेगळी स्मशानभूमी बांधून देण्यात येईल आणि त्या जागेचा सात बारा लवकरच देण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. त्यानंतर दुपारी दीड वाजता लक्ष्मीबाई आढागळे या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र दलित समाजाची सवर्णांकडून होणारी ससेहोलपट संपेल का ?, त्या गावगुंडांना शिक्षा होणार का असा सवाल गावकर्‍यांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2014 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close