S M L

महायुतीच्या 'एटीएम'मधला एम निखळला

Samruddha Bhambure | Updated On: Jun 4, 2014 05:48 PM IST

महायुतीच्या 'एटीएम'मधला एम निखळला

04 जून : शिवसेना, रिपाइं, भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, महासंग्राम या पाच पांडवाची ही महायुती...पण ही महायुती जमली ती गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच. रामदास आठवले, उद्धव ठाकरे आणि मी स्वत: मुंडे असे महायुतीचे एटीएम आहोत आणि हे एटीएम नीट जमले असून आम्ही सत्तेवर येऊन दाखवू असं गोपीनाथ मुंडे नेहमी सांगायचे. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. मंगळवारी या एटीएममधला एम निखळला आणि महायुतीला मोठा धक्का बसला.

शिवसेना आणि भाजप युती ही दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नामुळे सत्यात उतरली. या युतीचे खरे शिल्पकार प्रमोद महाजन तर गोपीनाथ मुंडे हे महायुतीचे शिल्पकार. महाजन यांच्या निधनानंतर 'मातोश्री'वर यशस्वी तह करण्यात मुंडे कायम यशस्वी राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचं मन राखणं हे सहज कुणाला जमले नाही. प्रमोद महाजन यांच्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी मात्र ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. पाच पाडवांच्या या महायुतीत कुणी नाराज झालं, कुणी रुसलं तर मुंडे त्यांची मनधरणी करण्यात सदैव हजर राहत. एकदा का 'पूर्णा'वर मुंडेंसोबत बैठक झाली तर प्रश्न मार्गी लागत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा 'मसिहा' अर्थात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना महायुतीत आणण्याचं कार्य मुंडेंनीच पार पाडलं. महायुतीत स्वाभिमानी आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या पट्‌ट्यात महायुतीला लोकसभेत घवघवीत यश मिळालं.

एवढंच नाहीतर मराठा आरक्षणावर लढा देणारे महासंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनाही मुंडे महायुतीत घेऊन आले. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे महायुतीला मोठा धक्का बसलाय. मुंडे यांच्यानंतर महायुतीत भाजपचा नेता कोण जागा घेणार हा प्रश्न आता निर्माण झालाय. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांचं नाव समोर येत आहे. 'मातोश्री'वर मर्जी सांभाळण्यासाठी नवा चेहर्‍यापुढे आव्हान आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव पुढे येऊ शकतं. मुंडे यांच्या अकाली निधनामुळे महायुतीच्या एटीएम मधला एम निखळला असून एटीएम आता पूर्ण होणार की नवं समीकरण तयार होणार हे येणार्‍या काळात कळेलच पण महायुतीत मुंडेंसारखा द्रुष्टा नेता मात्र नसणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 4, 2014 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close