S M L

मुदत संपली, कॅम्पा कोलावर हातोडा पडणारच !

Sachin Salve | Updated On: Jun 12, 2014 10:10 PM IST

मुदत संपली, कॅम्पा कोलावर हातोडा पडणारच !

12 जून : अखेर वरळीतील कॅम्पा कोलाच्या रहिवाशांची मुदत संपली आहे. आता महापालिका कोणत्याही क्षणी कॅम्पा कोलाचे अनधिकृत मजले पाडण्यासाठी कारवाई करू शकते. सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत आज संपली आहेत. मात्र कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी घरं खाली करण्यासाठी नकार दिला आहे. आम्ही आमचं घर सोडणार नाही, आम्हाला बाहेर काढलं तर कॅम्पा कोलाच्या प्रांगणात तंबू ठोकून राहु असा पवित्रा रहिवाशांनी घेतला. दरम्यान, शनिवार ते सोमवार या काळात कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना 488 कलमानुसार नोटीस बजावण्यात येणार आहे. घरं खाली करा नाहीतर बळजबरीनं घर खाली करू असं या नोटीशीत बजावण्यात येणार आहे. सुरवातीला वीज आणि पाणी तोडण्यात येईल आणि नंतर कारवाईला सुरुवात केली जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली.

कॅम्पा कोलाच्या अनधिकृत घरांना मुंबई पालिकेने नोटीसाही बजावल्या आहेत. कॅम्पा कोला प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप अयोग्य ठरेल असं कोर्टाने बजावलं होतं मात्र तरीही राजकीय पक्षांनी रहिवाशांसाठी धाव घेतली होती. आपलं घर वाचवण्यासाठी कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी अखेरचा पर्याय म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साकडं घातलं होतं. पण अनधिकृत बांधकामांविषयी मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली. या प्रकरणात हस्तक्षेप करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे मुंबईतल्या कॅम्पाकोलाच्या रहिवाशांचीही चिंता यामुळे वाढलीय. सनदशीर मार्गाने लढलेल्या लढाईत अपयश आल्यानंतर आता आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पाकोलावासीय रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, या इमारती पाडण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला मात्र कुठल्याही कॉन्ट्रक्टरने पसंती दर्शवली नाही. आतापर्यंत दोन वेळा या निविदा काढण्यात आल्या आहेत पण कुणीही कॉन्ट्रक्टरपुढे न आल्यामुळे तूर्तास कुणालाही हे कॉन्ट्रक्ट मिळालेलं नाही. पालिकेनं मात्र या इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत आणि कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. कारवाई करण्यासाठी पालिकेला पुन्हा एकदा या इमारतींच्या अनधिकृत मजल्यांची वीज आणि गॅसचा पुरवठा तोडावा लागणार आहे. त्यानंतर इमारतीमध्ये शिरुन भितींचा काही भाग पाडणार आहे. एवढी कारवाई करण्यासाठी पालिकेला कुठल्याही कॉन्ट्रक्टरची गरज नाही. त्यानंतर जेव्हा कधी कॉन्ट्रक्टर नेमला जाईल तेव्हा हे बांधकाम पाडण्यात येईल.

दरम्यान जीव गेला तरी बेहत्तर पण, आपण राहतं घर सोडणार नाही, बिल्डर आणि अधिकार्‍यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला का, अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतलीय. राज्यसरकारविरोधातही ते आपला रोष व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2014 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close