S M L

धक्कादायक, लोकलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

Sachin Salve | Updated On: Jun 12, 2014 07:07 PM IST

धक्कादायक, लोकलमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

34thane_local_muder12 जून : ठाणे-वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल-ठाणे लोकलमध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. गुरुवारी पहाटे घणसोसी स्थानकावर ही घडना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तुषार जाधव (22) असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. रत्नागिरीहुन कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबईत आल्यानंतर पनवेल येथील सहकारी विद्यार्थ्याच्या घरी परतत असताना लोकलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणी नवीमुंबई रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे.

ऐरोली येथे राहणार तुषार रत्नागिरीला इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत होता. गुरुवारी पहाटे तो आपल्या मित्रांसह कोकणकन्या एक्स्प्रेसने परतत असताना पहाटे पनवेल स्थानकावर उतरुन पुढे ऐरोलीला जाण्यासाठी निघाला. त्याच्या मित्रांपैकी दोघेजण ठाण्याला तर तिघेजण पुढे जाणार होते. तुषारने ऐरोलीला जाणारी पनवेल-ठाणे पहिली लोकल पकडली. लोकलच्या महिला डब्याच्या पुढील लगेजच्या डब्यात बसून प्रवास करीत असताना घणसोली स्थानकावर महिला डब्यातील पोलिसाला अचानक ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा, पोलिसांनी जाऊन पाहिलं असता धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. नंतर, लोकल ठाण्यात पोहचल्यावर तुषारला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसात शून्य क्रमांकाने हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी नवी मुंबई पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलीस मारेकर्‍याचा शोध घेत असून पनवेल ते ठाणे स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत. ही हत्या झाली तेव्हा तुषार कडे दागिने, पैसे आणि मोबाईल असे सामान होते परंतु ते चोरीला गेले नाही,त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली नसावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जेव्हा तुषार लोकलमध्ये चढला तेव्हा त्याच्यासोबत कोणी मित्र होते का ? किंवा कोणी अज्ञात इसम होता याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेने हादरलेल्या तुषारच्या कुटुंबीयांनी मारेकर्‍याची माहिती पोलिसांना अथवा आम्हाला द्यावी असं आवाहन केलं आहे तुषारच्या मारेकर्‍याला लवकरच जेरबंद करावे अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2014 07:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close