S M L

रेल्वे भाडेवाढीवरून महायुतीत मतभेद

Samruddha Bhambure | Updated On: Jun 22, 2014 06:01 PM IST

रेल्वे भाडेवाढीवरून महायुतीत मतभेद

22  जून :  रेल्वे भाडेवाढीवरून महायुतीमध्येच मतभेद असल्याचं आता समोर आलं आहे. ही रेल्वे भाडेवाढ धक्कादायक असून या प्रकरणात नरेंद्र मोदींशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे. मी स्वत: नरेंद्र मोदींशी याबाबत बोलेन आणि यावर काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले.

मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात 14.2 टक्के तर मालवाहतूक भाड्यात 6.7 टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबईकरांना बसणार असून लोकलचा मासिक पास दुपटीने वाढला आहे. यामुळे मोदी सरकारला 'हेच का ते अच्छे दिन?' असा सवाल विचारला जात आहे. भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष शिवसेनेनंही भाडेवाढीला विरोध दर्शवला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेच्या सरकारकडून अपेक्षा असताना निवडून आल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच ही दरवाढ करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. यासाठी मी स्वत: पंतप्रधान मोदींशी चर्चा करून भाडेवाढ मागे घेण्याची विनंती करणार आहे. दरवाढ मागे घेणं शक्य नसेल तर ती कमी करावी. भाडेवाढ करताना सर्व रेल्वे स्टेशनवर चांगली सुविधा मिळण गरजेचं आहे. भाडेवाढीसोबतच त्यांनी रेल्वे स्टेशनचीही सुधारणा करावी असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.

उद्धव ठाकरेंपाठोपाठ रामदास आठवलेंनीही रेल्वे दरवाढीला विरोध दर्शवला आहे. 14.2 टक्के दरवाढ अयोग्य असून दरवाढीचा निर्णय यूपीए सरकारचाच होता. पण ही दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा कापणारी आहे. आम्ही आगामी अधिवेशनात या दरवाढीचा निषेध करू असं आरपीआयचे नेते रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, रेल्वे भाडेवाढ कमी करण्याबाबत भाजप नेत्यांनी राजनाथ सिंग यांना विनंती केली असून लवकरच यावर निर्णय होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक पाहता झालेली दरवाढ पक्षाला अडचणीत आणू शकते, त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून याविषयी सकारात्मक निर्णय लवकर अपेक्षित असल्याची माहिती IBN लोकमतला सूत्रांनी दिली आहे तर दुसरीकडे ही भाडेवाढ अपरिहार्य होती, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काही दिवस का होईना पण मुंबईकरांना या भाडेवाढीची झळ सोसावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2014 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close