S M L

आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादी देणार काँग्रेसला निर्वाणीचा इशारा

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2014 12:40 PM IST

आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादी देणार काँग्रेसला निर्वाणीचा इशारा

23 जून : आगामी विधानसभा निवडणुकीला कोणाच्या नेतृत्त्वात सामोरं जायचं यावरून आघाडीत मोठी बिघाडी झालीय. 'मिशन मुख्यमंत्री हटाव' तूर्तास थांबल्यामुळे राष्ट्रवादीने आता टोकाची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण हटवले तरच आघाडी करावी, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचं कळतंय. त्यामुळेच येत्या बुधवारी होणार्‍या कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबरोबरच काँग्रेसला निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीकडून दिला जाईल, अशी चर्चा आहे.

लोकसभेत दारुण पराभवानंतर विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची तयारी चालवली होती खरी, पण, तूर्तास चव्हाणांना अभय मिळाल्याचं दिसतंय. निवडणुकीत आघाडीचं नेतृत्त्व करण्याचा आग्रह काँग्रेस श्रेष्ठींनी आपल्याकडे धरल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच केलं होतं. पण, या वक्तव्याच्या आधारेच मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू काँग्रेस हायकमांडसमोर मांडली आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची तूर्तास शाबूत राहिली. पण, पृथ्वीराज चव्हाण हटवले तरच आघाडी करावी, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांसमोर मांडल्याचं कळतंय.

त्यामुळेच येत्या बुधवारी होणार्‍या कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबरोबरच काँग्रेसला निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीकडून दिला जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळेच की काय उद्या म्हणजे मंगळवारी होणार्‍या मावळत्या बाराव्या विधानसभेच्या सदस्यांचा स्नेह समारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. कार्यक्रम रद्द करण्याचं कारण दिलं जात नसलं तरी आघाडीतल्या बिघाडीमुळेच हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आता बुधवारच्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याची अतिटोकाची भूमिका राष्ट्रवादी जाहीर करणार नाही ना, याकडे जाणकारांचं लक्ष लागलंय.

तटकरे प्रदेशाध्यक्षपदी, जाधव मंत्रिमंडळात ?

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्येही मोठे फेरबदल होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या जागी कोकणातील सुनील तटकरे यांची निवड पवारांनी केली आहे. भास्कर जाधव यांच्या कार्यपद्धतीवरची नाराजी विचारात घेऊन पवारांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून तटकरे यांची सुटका झाली आहे असं पवारांचं म्हणणं आहे. त्यामुळेच पवारांनी कुशल संघटक असलेल्या सुनील तटकरे यांची निवड पवारांनी केली असून याची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे आणि या निमित्ताने अजित पवार गटाचा पक्षसंघटनेवर वर्चस्व राहील अशीही चर्चा सुरू झाली आहे. या फेरबदलादरम्यान, भास्कर जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 09:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close