S M L

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2014 08:29 PM IST

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे

25 जून : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे फेरबदल केले आहे. सुनिल तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक झाली. सुरुवातीला भास्कर जाधव यांनी सुनील तटकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला जितेंद्र आव्हाड यांनी अनुमोदन दिलं. माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार अशी ग्वाही यावेळी तटकरे यांनी दिली.

सहा महिन्यांपूर्वीच शरद पवारांनी भास्कर जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी तर जितेंद्र आव्हाड यांची कार्याध्यक्षपदी निवड केली होती. पण हा प्रयोग फसल्याचं लक्षात येताच शरद पवारांनी कुशल संघटक असलेल्या सुनील तटकरे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना सर्व नेत्यांनी काँग्रेसवर चौफेर टीका करत लोकसभा निवडणुकीतल्या पराभववाचं खापर काँग्रेसवर फोडलं. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी काँग्रेसवर थेट टीका केली पण शरद पवारांनी मात्र थेट टीका टाळली.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिले. तसंच लोकसभेच्या निवडणुकीतल्या त्रुटी दूर करू, विधानसभेत सर्वात जास्त जागा राष्ट्रवादीलाच मिळणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसंच तटकरेंच्या अनुभवाचा पक्षाला मोठा फायदा होईल त्यांना आम्हा सर्वांची साथ राहिलं अशी ग्वाहीही पवारांनी दिली. सिंचनात आमची चूक नव्हती पण विरोधकांनी विनाकारण बदनामी केली असंही पवार म्हणाले. आरक्षणाबाबत आज चांगला निर्णय होईल असे संकेतही अजित पवारांनी दिले.

तर आम्ही मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली नाही, काँग्रेसनं नेतृत्व बदलावे किंवा ठेवावे आम्हाला देणं घेणं नाही. तुमच्यासारखे तगडे नेते असताना शरद पवारांची गरज काय ?, काँग्रेसचं नेतृत्त्व करायला पवार मोकळे नाहीत असा सणसणीत टोला छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2014 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close