S M L

राज्यावर दुष्काळाचं गहिरं सावट ; दुबार पेरणीचा आढावा सुरू

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2014 11:10 PM IST

drought_in_maharashtra30 जून : राज्यात पावसानं दडी मारल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. राज्य सरकारने मागील दुष्काळाचा अंदाज घेत तयारीला लागली आहे. पाऊस न पडल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. राज्यभरात पेरण्या शून्य टक्क्यांखाली आल्या आहेत त्यामुळे दुबार पेरणी करावी लागेल का याचा आढावा घेण्याचं कामही सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून तळ कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. पुढील चार दिवसात जर पावसाने हजेरी लावली तर परिस्थिती नियंत्रणात राहिल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढेच काही दिवस हे राज्यासाठी महत्वाचे असणार आहे.

'धरणांतलं पाणी पिण्यासाठीच'

जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. पण, सध्या राज्यातील धरणांमधला साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यावर गेला आहे. त्यामुळे सर्व धरणांमधलं पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली. सध्या राज्यातल्या पेरण्या शून्य टक्क्यांखाली आल्या आहेत. पाण्याविषयी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत तसंच तहसिलदारांना पाण्याविषयीचे अधिकार देण्याचा निर्णय लागू राहील, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

जळगावात शेतकर्‍याची आत्महत्या

पाऊस लांबल्याने राज्यात पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू झालंय. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातल्या भास्कर सरोदे या शेतकर्‍यानं आत्महत्या केलीय. सरोदे यांचं पावसामुळे कापसाचं पीक वाया गेलं, नंतरच्या गारपीटीमुळे मक्याचं पीकही हातचं गेलं. त्यासाठीचं कर्ज त्यांच्या डोक्यावर होतं. या हंगामात चांगलं पीक घेऊन ते कर्ज फेडणार होते. पण, पावसाने ओढ दिल्याने ते पुरते हताश झाले होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. यापूर्वी लातूर आणि अहमदनगरमध्ये शेतकर्‍यांनी आत्महत्या केली होती.

मोदींनी घेतला आढावा

पाऊस लांबल्यानं जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतींवरही परिणाम होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवारी) संध्याकाळी जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतींचा आढावा घेतला. पुरवठा यंत्रणेतल्या अडचणी दूर करा, अशा सूचना केंद्राने सर्व राज्य सरकारकारांना दिल्या आहेत.

राज्यातील भाजप नेते घेणार कृषीमंत्र्यांची भेट

पावसाअभावी उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भाजपचे राज्यातील नेतेही केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटून ते राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती देणार आहेत. राज्याला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी राज्यातले भाजपचे नेते केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटणार आहेत. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि भाजपच्या राज्यातल्या खासदारांचा समावेश आहे.

दोन दिवसात तळकोकणात मान्सून सक्रिय

पाऊस नसल्यामुळे दयनीय अवस्था झालीय. पण, येत्या दोन ते तीन दिवसात तळकोकणात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यभरावर लांबलेल्या पावसामुळे पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं असताना हवामान खात्याच्या या अंदाजामुळे दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. येत्या 48 तासांनतर तळकोकणात हलक्या सरींना सुरवात होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात मान्सून सक्रिय होतोय. येत्या दोन दिवसात तो राज्याच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

 थेंब थेंब पाण्यावर रोपाचं आयुष्य

गेले पंधरा दिवस पावसाचा थेंब नसल्यामुळे सिंधुदुर्गातले शेतकरी हवालदील झालेयत. रुजून आलेली भाताची रोपं करपून गेली आहेत. तर अनेक ठिकाणी अजून पेरण्याच झालेल्या नाहीत. जे काही पेरलंय ते मरून जाऊ नये म्हणून हे शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. अनेक ठिकाणी तर चक्क विहिरीतलं पाणी काढून हंडा कळशीने शेताला जगवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर ज्यांना शक्य आहे ते पंपाने पाणी आणून लावण्या करून घेत आहेत. लावणी झाली तरी पाऊस नसल्याने दर दिवशी शेताला दोन वेळ पाणी द्यायचं तरी कसं हा प्रश्न शेतकर्‍यांना पडलाय. पाऊस गायब होण्याची ही परिस्थिती पहिल्यांदाच पाहिली असल्याचं शेतकरी सांगतायत. पुढच्या चार दिवसात मुबलक पाऊस झाला नाही तर पिकवायचं काय आणि खायचं काय या चिंतेत इथले शेतकरी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2014 11:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close