S M L

भाजपची 'शहा'निशा संपली, 'शिवसेना तर मोठा भाऊ' !

Sachin Salve | Updated On: Jul 16, 2014 11:18 PM IST

भाजपची 'शहा'निशा संपली, 'शिवसेना तर मोठा भाऊ' !

16 जुलै : शिवसेनेसोबत गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या 'संसारा'तून काडीमोड घेण्याचा निर्णय 'शहा'निशा पूर्ण केल्यानंतर 'आमचा संसार सुखाने' चालू राहणार असं जाहीर केलंय. शिवसेना तर आमचा मोठा भाऊ आहे, आमची युती राजकीय नसून वैचारिक आहे त्यामुळे ही युती तुटणार नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. भाजपचे नवे अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीची पहिली बैठक घेतली. या बैठकीत युती तोडण्याच्या मागणीने पुन्हा एकदा डोकवर काढलं पण शाहांनी युती तुटणार नाही असं भाजपच्या नेत्यांना सुनावलं.

'आता बस्स झाला, 25 वर्ष सहन केलं आता स्वबळावर लढू' असा नारा भाजपच्या नेत्यांनी देऊन शिवसेनेशी घटस्फोट घेण्याचा आग्रह धरला होता. एवढंच नाहीतर 'राष्ट्र जिंकले आता महाराष्ट्र जिंकू' अशी गर्जनाही करण्यात आली. युतीत अगोदरच 'मी मुख्यमंत्री होणार' यावर वाद सुरू होता त्यात युती तोडण्याच्या वादाने आणखी भर घातली. पण आपल्या नेत्यांच्या मागणीचा आदर करत 'थोडं थांबा, सबुरीने घ्या 'असा सल्ला देत भाजपच्या प्रदेशध्यक्षांनी युती तुटणार नाही असं जाहीर करुन विषय पेटता ठेवला.

मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे आणि खास सहकारी अमित शाह भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता शहा यांनी 'मिशन महाराष्ट्र' मोहीम हाती घेतली. यासाठी दिल्लीत राज्यातील सर्व भाजपच्या नेत्यांना बोलावून घेण्यात आलं.

शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात लोकसभेच्या धर्तीवर 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवण्यात येणार, असा निर्णय घेण्यात आलं. पण त्याचबरोबर शिवसेनेचा विषयही भाजपच्या नेत्यांनी मांडला. पण शहा यांनी युती अभेद्य राहिलं अडीअडचणीत सेनेनं आपल्याला मदत केलीय अशा शब्दात शहा यांनी सुनावलं. बैठक आटोपल्यानंतर भाजप नेते राज्यात परतले. आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बातचीत करत असतांना युती तुटणार नाही असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठे भाऊ होतो, राज्यात विधानसभेमध्ये ते मोठे भाऊ असता आणि आम्ही लहान भाऊ होतो. केवळ राजकारणा करता जी युती केली जाते ती तोडायला एक मिनीटही लागत नाही. पण आम्ही शिवसेनेशी राजकारणासाठी युती केली नाही. ती वैचारिक युती आहे. त्यामुळे ही वैचारिक युती तुटण्याची शक्यता नसून भाजपची मानसिकता नाही आणि भाजप ते कधी करणार नाही असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2014 10:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close