S M L

नारायण राणे सोमवारी राजीनामा देणार

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2014 05:39 PM IST

7878narayan_rane17 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी नारायण राणे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडणार नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय. नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर त्याला आता पूर्णविराम मिळालाय.

लोकसभा निवडणुकीपासून नारायण राणे नाराज होते. एवढंच नाही तर ते भाजपच्या संपर्कात आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसंच अलीकडेच प्रदेश काँग्रेसच्या कोकण विभागाच्या बैठकीला राणे आणि त्यांच्या समर्थकांनी दांडी मारली होती. त्यामुळे ही बैठकच पुढे ढकलावी लागली.प्रदेश काँग्रेसच्या इतर सर्व विभागाच्या आढावा बैठका झाल्या असताना कोकण विभागाच्या बैठकीला मात्र अजूनही मुहूर्त सापडत नाही. याबाबत आयबीएन लोकमतनं जेव्हा प्रदेशाध्यक्षांना विचारलं तेव्हा त्यांनीही थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली.

तर राणे उद्यापासून कोकणच्या दौर्‍यावर चालले आहे. या दौर्‍यादरम्यान, ते कोकणातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तसंच आपल्या नाराजीचं कारणही जाहीर करणार आहे. मात्र राणेंची नाराजी दूर करू करण्याचा प्रयत्न करू आणि पक्ष त्यांच्याशी चर्चा करणार असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितलं.

राणेंना सेनेचं दार बंद

दरम्यान, बाळासाहेबांना त्रास देणार्‍यांना शिवसेनात घेणार नाही असं सांगत नारायण राणेंसाठी महायुतीचे दरवाजे बंद झाले आहेत असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. पण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत राज्यातले भाजपचे नेते मात्र ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळे नारायण राणे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील का, या प्रश्नावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे.

राणे काँग्रेसमध्ये नाराज का आहेत ?

  • - मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींनी बेदखल केल्याची भावना
  • - मराठा आरक्षणाचं श्रेय मुख्यमंत्र्यांनी हिरावलं
  • - पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी दिली जात नाही
  • - राणेंवर दिल्लीचा विश्वास नाही
  • - सिंधुदुर्गात काँग्रेसमध्ये बंडाळी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2014 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close