S M L

'त्या' हल्ल्यातून एअर इंडियाचं विमान थोडक्यात बचावलं !

Sachin Salve | Updated On: Jul 18, 2014 06:20 PM IST

'त्या' हल्ल्यातून एअर इंडियाचं विमान थोडक्यात बचावलं !

18 जुलै : ऍमस्टरडॅमकडून क्वालालंपूर कडे जाणारं मलेशियन एअरलाईन्सचं विमान युक्रेनजवळ क्षेपणास्त्रानं हल्ला करून पाडण्यात आलं. पण या प्रकरणाची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या विमानाच्या मागेच भारताच्या एअर इंडियाचं विमान होतं अशी माहिती एअर इंडियाने दिली. या हल्ल्यानंतर एअर इंडिया आणि जेट एअरवेजसह अनेक विमान कंपन्यांनी तातडीने या मार्गावरुन वाहतूक खंडित केली.

आज या विमानाचा ब्लॅक बॉक्स आज सापडला आहे. या विमानातील सर्व प्रवासी ठार झाल्याची माहिती युक्रेनच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. या विमानातले सर्व कर्मचारी मलेशियाचे नागरिक होते. तर प्रवाशांमध्ये 156 डच, 27 ऑस्ट्रेलियन, 23 अमेरिकी, 12 इंडोनेशियन, 9 इंग्रज, 4 जर्मन आणि एका कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे. विमानाला अपघात झाला त्या ठिकाणी अनेक अवयव विखुरलेले होते अशी माहिती मिळत आहे. या विमानामध्ये भारतीय नागरिक नव्हते असं हवाई वाहतूक मंत्री अशोक गजापती राजू यांनी स्पष्ट केलंय. जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रानं हल्ला करून हे विमान पाडण्यात आलं असावं असा निष्कर्ष अमेरिकी अधिकार्‍यांनी काढलाय. हे विमान रशियाच्या सीमेजवळ पूर्व युक्रेनवरून उडत असताना त्याला पाडण्यात आलं.

 

युक्रेन आणि रशियात आरोप प्रत्यारोप

बोईंग 777 विमान रशियाच्या सीमेजवळ पूर्व युक्रेनवरून उडत असताना त्याला पाडण्यात आलं. हा भाग युक्रेनमधल्या रशियन बंडखोरांचा तळ समजला जातो. हा हल्ला कोणी केला यावरून युक्रेन आणि रशियानं एकमेकांवर आरोप केले आहेत. हल्ल्यात रशियन लष्करी गुप्तचर अधिकार्‍यांचा हात असल्याचा आरोप युक्रेननं केला आहे, तर युक्रेनमधल्या फुटीरवादी गटांविरोधात युक्रेनच्या लष्करी मोहिमेमुळे हा हल्ला घडल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एकमेकांशी फोनवरून चर्चा केली आहे.

मलेशियन पथक रवाना

या हल्ल्याचा तपास करण्यासाठी मलेशियाचं पथक युक्रेनला निघालं असल्याची माहिती मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी दिली आहे. या पथकामध्ये आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ, मदत पथक आणि मेडिकल टीमचा समावेश आहे, अशी माहिती रझाक यांनी पत्रकार परिषदेत दिली. युक्रेनच्या सरकारनंही मलेशियाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. मलेशियन पथकाला सुरक्षितपणे दुर्घटनास्थळी जाऊ देण्यासाठी युक्रेन सरकार तिथल्या बंडखोरांशीही चर्चा करणार असल्याचं नजीब रझाक यांनी सांगितलं.

रशियाचे अध्यक्ष होते लक्ष्य

दरम्यान, या हल्ल्याचे लक्ष्य मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग 377 नसून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचं विमान असावं असा संशय रशियाच्या न्यूज एजन्सीने रशियाच्या हवाई वाहतूक मंत्रालयाच्या हवाल्यानं व्यक्त केलाय. रशियन टीव्हीनं हे वृत्त प्रसारित केलंय. ज्या मार्गाने बोईंग 377 गेलं, त्याच मार्गावरून आणि त्याच उंचीवरून 40 मिनिटांनी पुतीन यांचं आयएल 96 हे विमान जाणार होतं.

संयुक्त राष्ट्रांची तातडीची बैठक

या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं तातडीची बैठक बोलावलीये. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारनंतर ही बैठक होईल. ब्रिटननं या बैठकीची मागणी केली होती. या अपघाताची संपूर्ण, सखोल आणि स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास केला जावा अशी मागणी ब्रिटनने केली आहे. त्याला संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल बान की मून यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2014 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close