S M L

इराकमध्ये अडकले लातूरचे तरुण !

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2014 05:59 PM IST

इराकमध्ये अडकले लातूरचे तरुण !

latur_missing19 जुलै : इराकमधील भारतीय हळुहळू परतत असले तरीही अनेक जण अजूनही अडकलेले आहेत. या अडकलेल्या भारतीयांमध्ये लातूर जिल्ह्यातील तरूणांचाही समावेश आहे. केरळ सरकारने इराकमधल्या नर्सेसच्या सुटकेसाठी जसे प्रयत्न केले तसे प्रयत्न महाराष्ट्र सरकार करणार का असा प्रश्न या तरुणांचे कुटुंबीय करत आहे.

इराकमधल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या लातूर जिल्ह्यातील अनेक तरुणांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला असून त्यांचे कुटुंबीय त्यांच्या काळजीत आहेत. निलंगा तालुक्यातल्या अंबुलग्यामधले ज्ञानेश्वर भोसले, नितीन कांबळे तर शिरढोणचे प्रमोद सोनवणे यांसारख्या अनेकांशी संपर्क होत नाहीये. हे तरुण रोजगारासाठी इराकला गेलेले आहेत. सरकारने आमच्या मुलांना सुखरूप भारतात आणावे अशी मागणी ही कुटुंब करीत आहेत

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगारासाठी इराकला गेले आहेत. इराकमध्ये बंडाळी सुरू झाल्यापासून हे तरुण भारतात परतण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांची इच्छा असूनही त्यांना भारतात परत येऊ दिलं जात नाहीये, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मुलांचे पासपोर्ट ते जिथे काम करीत होते त्या इराकी व्यक्तींनी काढून आपल्या ताब्यात ठेवले आहे.

कामाची मुदत संपल्याशिवाय तुम्हाला परतता येणार नसल्याचे त्यांचे इराकी मालक सांगतात, असं बालाजी भोसले आणि ज्ञानेश्वर भोसले या तरुणांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं. या तरुणांची एजंट्सनी फसवणूकसुद्धा केली आहे. बागकाम म्हणून अनेकांना इराकमध्ये श्रमाची कामे करवून घेतली जात आहेत. अशातच गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून संपर्क तुटल्याने कुटुंबियांची चिंता आणखीनच वाढलीय.

केरळमधल्या नर्सेस बरोबर हे तरुण घरी परत येतील अशी मोठी आशा या कुटुंबियांना होती, पण ही अपेक्षा आता फोल ठरली आहे. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या भागात असलेल्या या कुटुंबियांना सरकारकडून कसलीही माहिती पुरविण्यात येत नाहीय. सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं मात्र त्याचाही काहीच उपयोग झालेला नाही.

झोपडीतल्या दिव्याला तेल घेण्याइतके पैसे मिळवण्यासाठी इराकला गेलेले हे तरुण, आता कसे आहेत हे कुणालाच कळत नाहीय. कुटुंबातल्या सगळ्यांचे मोबाईलबरोबरच रस्त्याकडे लक्ष लागलंय. मुलांच्या विवंचनेत अडकलेल्या या कुटुंबांना आपलं सरकार आता तरी मदत करणार आहे की नाही हा प्रश्न कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2014 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close