S M L

नारायण राणेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Samruddha Bhambure | Updated On: Jul 21, 2014 04:25 PM IST

7878narayan_rane

21  जुलै : उद्योगमंत्री नारायण राणे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राणेंनी त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवून राणे तडक आपल्या बंगल्यावर परतले. दुपारच्या पत्रकारपरिषदेनंतर ते माणिकराव ठाकरेंची भेट घेतील.

नारायण राणे बर्‍याच दिवसांपासून हायकमांड आणि मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात लढली तर काँग्रेसचा पुन्हा दारुण पराभव होईल, असं राणेंनी म्हटलं होतं. काँग्रेस पक्षाने मला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचा शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे मला वारंवार तीच तीच कारणं हायकमांडला सांगण्याची इच्छा नाही. म्हणूनच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाजूला होत आहोत, असंही नारायण राणेंनी IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. 'मला मुख्यमंत्रीपदच हवं किंवा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचाराचं नेतृत्त्व करायला मिळावं' अशी मागणीरुपी इच्छाही राणेंनी यावेळी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, आपण काँग्रेस सोडणार नाही, असं राणेंनी आपल्याला आधीच सांगितलं होतं. त्यांची पत्रकार परिषद झाल्यावर मी त्यांची भेट घेणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नवी दिल्लीत सांगितलं आहे.

राणेंची राजकीय वाटचाल

  • 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
  • 2005 - शिवसेनेतून हकालपट्टी, काँग्रेसमध्ये प्रवेश
  • महसूल आणि त्यानंतर उद्योग खात्यांचे मंत्री
  • 2008 - अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर पुकारला बंड
  • काँग्रेस हायकमांडवर सडकून टीका, काँग्रेसमधून निलंबन
  • पक्षश्रेष्ठींची मागितली माफी, निलंबन मागे

 नारायण राणेंसमोरचे पर्याय

  • काँग्रेसमध्येच राहून दबाव वाढवणे
  • निवडणुकीत स्वाभिमानचं कार्ड वापरून उमेदवार उभे करणे
  • भाजपमध्ये प्रवेश करणे किंवा बाहेरुन मदत करणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2014 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close