S M L

बैठक निष्फळ, राणेंचा फैसला आता दिल्ली दरबारी !

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2014 04:22 PM IST

बैठक निष्फळ, राणेंचा फैसला आता दिल्ली दरबारी !

22 जुलै : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला खरा पण अजूनही काँग्रेसमध्ये राजीनामा स्वीकारावा की नाही यावरुन तळ्यातमळ्यात सुरू आहे. या प्रश्नी आज (मंगळवारी) मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. दोन तास ही बैठक चालली. या बैठकीला नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री हजर होते. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

बैठकीनंतर राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यांनी अजून राजीनामा स्वीकारलेला नाही. राजीनाम्याच्या निर्णयावर पक्षाध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा करुन निर्णय घेण्याचं ठरलंय. यासाठी माणिकराव, मी आणि मुख्यमंत्री दिल्लीत सोनियांची भेट घेणार आहोत त्यानंतर दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असं राणे यांनी सांगितलं. आपल्याला कोणतीही ऑफर देण्यात आली नाही पक्षातच राहावं असा आग्रहही धरण्यात आलाय असंही राणे म्हणाले.

तसंच या बैठकीत चर्चेनं माझं समाधन झालं नाही असंही राणे म्हणाले. आता याबाबत राणे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सोनिया गांधींना भेटायला जाणार आहेत. सोनियांना भेटून सर्व मुद्दे सांगणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. एकूणच नारायण राणे अजूनही मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत असंच दिसतंय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या बैठकीबद्दल ट्विट केलंय. "मी आणि माणिकराव ठाकरेंनी तासभर राणेंशी चर्चा केली. त्यांनी राजीनाम्यात दिलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही आमच्यात चर्चा झाली. या बैठकीत जे झालं त्याबद्दल मी हायकमांडला कळवणार आहे. त्यानंतर हायकमांड निर्णय घेईल." असं या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2014 03:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close