S M L

20व्या कॉमनवेल्थ गेम्सचं दिमाखात उद्घाटन

Samruddha Bhambure | Updated On: Jul 24, 2014 11:01 AM IST

20व्या कॉमनवेल्थ गेम्सचं दिमाखात उद्घाटन

24   जुलै :  ग्लासगोव्हमध्ये आयोजित 20व्या कॉमनवेल्थ गेम्सचा उद्घाटन समारंभ काल मध्यरात्री मोठ्या दिमाखात पार पडला. स्कॉटलंडमधील सर्वात शांत शहर म्हणून ओळखलं जाणार्‍या ग्लासगोव्ह या शहरात ही स्पर्धा सुरू झाली आहे. प्रथेप्रमाणे कॉमनवेल्थ देशांची प्रमुख म्हणून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन केलं. या स्पर्धेत पूर्वी ब्रिटीश साम्राज्याचा भाग असलेल्या आणि आता स्वतंत्र असलेल्या 71 देशांमधले 4929 ऍथलीट्स आपलं कौशल्य दाखवतील. 11 दिवस होणार्‍या या स्पर्धेत 215 भारतीय खेळाडूंचा यात समावेश आहे. अस्सल भारतीय वेशभूषेतील भारतीय संघाने ग्लासगोव्ह स्टेडियमवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. 3 तास सुरू असलेल्या या उद्घाटन समारंभासाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाचे राजकीय नेतेही यावेळी हजर होते. हा सोहळा जगभरात तब्बल 1 अब्ज प्रेक्षकांनी पाहिला, असा दावा आयोजकांनी केला आहे.

भारतीय संघाची शान असलेला शूटर विजयकुमारने उद्घाटन समारंभात भारताचं नेतृत्व केले. ऑलिम्पिकचा सिल्व्हर मेडलिस्ट असलेल्या विजय कुमारकडून या स्पर्धेतही बर्‍याच अपेक्षा आहेत. भारतीय खेळाडूंचा पोषाख गेल्या वेळच्या कॉमनवेल्थ गेम्सप्रमाणेच होता. पुरुष ऍथलीट्सनी काळा कोट घातला होता तर मुलींनी साड्या नेसल्या होत्या. हिंदी गाण्यांच्या सुरामध्येच भारतीय टीमनं सेल्टिक स्टेडियममध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांचं एकाच जल्लोषात स्वागत झालं.

स्कॉटलंडमध्ये तिसर्‍यांदा कॉमनवेल्थ गेम्स होत आहे. या आधी 1986मध्ये राणीने पहिल्यांदा स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं. ब्रिटनचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी ऑलिम्पिकपटू आणि सायकलिस्ट सर ख्रिस हॉय यांना राणीकडे बॅटन सोपवण्याचा मान देण्यात आला. सर ख्रिस हॉय स्कॉटलंडचेच नागरिक आहेत. स्पर्धेचं उद्घाटन जाहीर करण्यापूर्वी राणीनं कॉमनवेल्थसाठी संदेश वाचून दाखवला. तर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा व्हिडिओही या उद्घाटन सोहळ्याचं एक वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 'युनिसेफ'चा ब्रँड ऍम्बॅसेडर आहे. जगभरातल्या मुलांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी देणग्या द्याव्यात असं आवाहन त्यानं या व्हिडिओद्वारे केलं. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उद्घाटनाला अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2014 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close