S M L

बंड शमलं : राणे काँग्रेसमध्येच, राजीनामाही मागे

Samruddha Bhambure | Updated On: Aug 6, 2014 12:12 PM IST

बंड शमलं : राणे काँग्रेसमध्येच, राजीनामाही मागे

 05 ऑगस्ट : आपण यापुढेही काँग्रेसमध्येच राहणार असून उद्यापासूनच पक्षाच्या प्रचारासाठी दौरा करणार असल्याचं सांगत नारायण राणे यांनी आपलं बंड अखेर मागे घेतलं आहे. याचबरोबर आपण उद्योग मंत्रिपदी कायम राहणार असल्याचंही स्पष्ट केलंय. 15 दिवसांपूर्वी राणेंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना भेटून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यानंतर राणे यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर आपण काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

माझ्याबाबत याआधी जे घडलं ते यापुढे घडणार नाही. आपला सन्मान राखला जाईल, असं आश्वासन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं राणेंनी सांगितलं. तसंच आगामी निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. राणेंनी आपल्या मुलगा नितेश राणेसाठीही पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळेल की नाही, हे मी आता सांगू शकत नाही, असे स्पष्ट करीत विजय मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीत बदल होणार असं आश्वासन सगळ्यांनी दिल्याचंही राणेंनी सांगितलंय.

आपण कोणत्याही पक्षाच्या किंवा कोणत्याही पक्षातल्या नेत्यांच्या संपर्कात नव्हतो. उलट तेच माझ्याशी संपर्क साधत होते, असेही राणे म्हणाले. शिवसेनेचा पराभव करण्यास मी सज्ज असून उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या पुण्याईवर पक्ष चालवत असल्याची टीका राणेंनी यावेळी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आमची सकारात्मक चर्चा झाली असून राणेंचं म्हणणं हायकमांडला कळवण्यात येईल, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2014 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close