S M L

आव्हाड 'संघर्षा'ला पेटले, बालगोविंदासाठी सुप्रीम कोर्टात धाव

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2014 10:13 AM IST

आव्हाड 'संघर्षा'ला पेटले, बालगोविंदासाठी सुप्रीम कोर्टात धाव

11 ऑगस्ट : थराच्या थरारातून हायकोर्टाने बालगोविंदांची सुटका केली खरी पण दहीहंडी आयोजक मात्र 'संघर्षा'ला पेटले आहे. मुंबईत दोन बालगोविंदाच्या बळी घेणार्‍या दहीहंडीत 18 वर्षांच्या मुलांना बंदी घालण्याचा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. पण या निर्णयाविरोधात

सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीचे आयोजक आणि राष्ट्रवादीचे नेते, वैद्यकीय मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. एकीकडे बालगोविंदाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे तर दुसरीकडे आव्हाडांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरवर्षी मुंबईत दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. ठाणे,वरळी, घाटकोपर, नवी मुंबई या ठिकाणी राजकीय पक्षांकडून मोठमोठ्या दहिहंडी लावल्या जातात. लाखोंच्या बक्षीसासाठी गोविंदा जीवाची बाजी लावून थर लावतात. मात्र या थराच्या थरारात बालगोविंदाचा बळी ठरण्याच्या दुर्देवी घटना घडता. त्यामुळे हायकोर्टाने वेळीच दखल घेत मागील आठवड्यात 12 वर्षाखालील बालगोविंदांना बंदी घातली आहे. पण गोविंदा पथकांनी कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली. दहिहंडीच्या सरावादरम्यान बालगोविंदाचा सहभाग करुन घेतला. परिणामी मागील आठवड्यात नवी मुंबईत किरण तळेकरी या बालगोविंदाचा थरावरुन पडून मृत्यू झाला तर आज जोगेश्वरीमध्ये ह्रषिकेश पाटील या तरुणाचा मृत्यू झाला.

त्यामुळे मुंबई उच्चन्यायालयाने या प्रकरणाची जनहित याचिकेवर निर्णय देत थरारातून बालगोविंदांची सुटका केलीय. 18 वर्षांखालच्या मुलांचा दहीहंडीत सहभाग असू नये अशी सूचना केलीये. दहीहंडीसंदर्भातल्या जनहित याचिकेवर राज्य सरकारनं आज उच्च न्यायालयात निवेदन दिलं, त्यानुसार 20 फुटांपर्यत दहिहंडीचे थर लावण्यास परवानगी देऊ, असं राज्य सरकारनं उच्च न्यायालयाला सांगितलं. दहीहंडीसंदर्भात परिपत्रक काढण्यात येईल अशीही माहिती राज्य सरकारने दिली. त्यावर नियमांचं उल्लंघन करणार्‍या गोविंदा पथकांवर कोणत्या कायद्यांनुसार कारवाई करणार हे परिपत्रकात नमूद करा, असंही उच्च न्यायालयाने सांगितलं.

मात्र कोर्टाच्या या निर्णयाविरोधात संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीचे आयोजक आणि राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाचा निर्णय हा दुर्देवी आहे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली. तसंच या खेळावर मी लहानपणापासून प्रेम केलं. ताडदेवच्या चाळीत राहत असताना दहिहंडीत सहभागी झालो होतो. 1993 साली तर दहिहंडीत जखमी झाल्यामुळे माझा मृत्यूशी सामना झाला होता. पण एक आयोजक म्हणून या खेळाला मोठ केलं पाहिजे असं आव्हाड म्हणाले.

सरनाईकांची 'संस्कृती' दहीहंडी रद्द

तर दुसरीकडे न्यायालयाच्या या निर्णयाचा आदर करुन आमदार प्रताप सरनाईक यांनी संस्कृती युवा प्रतिष्ठानातर्फे दहीहंडी न लावण्याचा निर्णय घेतला आहे.  नुकत्याच झालेल्या गोविदांच्या मृत्यूमुळे दहीहंडी यंदा बंद करण्याचा निर्णय संस्कृती युवा प्रतिष्ठाननं घेतलाय. मात्र दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. अनेक गोविंदाच्या मृत्युमुळे सामान्य जनतेत रोष असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या दहीहंडीच्या खर्चातून जो पैसा वाचेल तो रिक्षेतून पडलेल्या स्वप्नाली लाड हिला मदत म्हणून देण्यात येणार आहे असंही सरनाईक यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2014 08:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close