S M L

गोविंदा रे गोपाळा, बक्षिसांचे 'लोणी' नको !

Sachin Salve | Updated On: Aug 17, 2014 02:34 PM IST

govinda_vs_court16 ऑगस्ट : कोर्टाची लढाई जिंकलेल्या गोविंदांनी आता नवाच 'थर' रचला आहे. आम्ही बक्षिसांसाठी दहीहंडी खेळत नाही असा साक्षात्कार आता गोविंदांना झाला असून आता बक्षिसांची रक्कम स्वीकारणार नाही असा पवित्रा गोविंदा पथकांनी घेतला आहे. दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी याबाबत भूमिका जाहीर केली.

गेल्या आठवड्यात गोविंदा आणि हायकोर्टाचा वाद चांगलाच रंगला होता. हायकोर्टाने सुरक्षेच्या कारणास्तव 12 वर्षाखालील गोविंदांना अगोदर बंदी घातली. पण तरीही गोविंदापथकांनी काही बालहट्ट सोडलाच नाही. परिणामी नवी मुंबई आणि जोगेश्वरीमध्ये दोन बालगोविंदांनी जीवाला मुकावे लागले. त्यामुळे हायकोर्टाने दखल घेत 18 वर्षाखाली गोविंदांना बंदी घातली तसेच 20 फुटांपेक्षा जास्त थर लावता येणार नाही असंही कोर्टाने बजावलं.

त्यामुळे नाराज झालेल्या गोविंदांनी थेट कोर्टालाच आव्हान दिलं. 8 ते 10 थर लावणारच आणि नेहमी सारखी दहीहंडी खेळणारच असा आक्रमक पवित्रा घेतला. तर राष्ट्रवादीचे नेते आणि ठाण्यातील संघर्ष दहीहंडीचे आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. सुप्रीम कोर्टाने गोविंदांना दिलासा देत थराच थर लावण्यास परवानगी दिली. पण आता गोविंदांचं म्हणणं आहे की, आम्ही बक्षिसांसाठी थर लावत नाही आणि बक्षीस स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे दहीहंडी आयोजक बुचकळ्यात सापडले आहे.

ठाण्यातील संघर्ष दहीहंडी मंडळाने 10 थरांसाठी 25 लाख, 9 थरांसाठी 15 लाख आणि 8 थरांसाठी 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. अशाच प्रकारचे बक्षीस इतरही मंडळाने जाहीर केले आहे. गोविंदा पथकांनी कोणत्याही प्रकारचे बक्षीस स्वीकारणार नाही असे जाहीर केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यापुढे पेच निर्माण झालाय.

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायदा घेण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय असा आरोप ठाणेकर करत आहेत. पण दुसरीकडे मंडळांच्या जेवणासाठी वाहतुकीसाठी खर्च लागतो आणि त्यामुळे हे बक्षीस देण्यात येणार असल्याचे आव्हाडांनी स्पष्ट केलं. तसंच गोविंदा समन्वय समितीला गोविंदांच्या व्यथा समजत नाही असा आरोपच आव्हाड यांनी केलाय. आता दोन दिवसांवर दहीहंडीचा उत्सव येऊन ठेपला आहे त्यामुळे गोविंदा 'लोणी' लुटतात की फक्त पाण्याने भिजतात हे पाहण्याचं ठरेल.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2014 09:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close