S M L

मुंबईकरांच्या भेटीला लवकरच येतायेत अमेरिकन पेग्विंन्स

Samruddha Bhambure | Updated On: Aug 21, 2014 12:03 PM IST

मुंबईकरांच्या भेटीला लवकरच येतायेत अमेरिकन पेग्विंन्स

21 ऑगस्ट :  गेल्या काही वर्षांत रया गेलेल्या भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात अनेक वर्षांनी प्रथमच नवीन रहिवासी येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर उद्यानात दक्षिण अमेरिकेतील 6 पेंग्विन पक्षी आणण्यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला. तब्बल 2 कोटी 57 लाख रुपये खर्चून महापालिका हे पेंग्विन मुंबईकरांच्या भेटीला आणणार आहे.

भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात 20 हम्बोल्ट पेंग्विन आणण्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये 10 नर आणि 10 मादी पेंग्विनचा समावेश आहे. मात्र सध्या 3 नर आणि 3 माद्या असे 6 पेंग्विन आणण्याचे ठरवण्यात आले आहे. हे पेंग्विन आणण्यासाठी पुरवठादार कंपनीवर शिक्कामोर्तब करण्यासाठीच्या प्रस्तावावर स्थायी समितीत चर्चा होईल. कार्यादेश मिळाल्यावर 4 महिन्यांच्या आत या पेंग्विनना प्राणीसंग्रहालयात आणणे बंधनकारक असणार आहे.

प्राणीसंग्रहालयात बांधलेल्या एक्स्प्लोरेशन सेंटरच्या तळमजल्यावर एक विशेष पक्षीगृह बांधण्यात आले आहे. तिथे पेंग्विनसाठी शंभर चौरस मीटरचा पिंजरा बांधण्यात येणार आहे. त्यातील अर्धी जागा पाण्याने व्यापलेली असेल. याशिवाय या पेंग्विनना नैसर्गिक वातावरण मिळण्यासाठी बीळ, गुहा, दगड उपलब्ध करून देण्यात येतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय निर्णय घेतले जात आहेत. पेंग्विनच्या आगमनाचा प्रस्ताव त्यातील एक भाग असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगतेय.

असे असतील पेंग्विन

भायखळ्याच्या उद्यानात येणारे पेंग्विन अंटार्टिकाच्या बर्फाळ प्रदेशातील पेंग्विन नसून ते दक्षिण अमेरिकेतील मध्य चिली देशाच्या किनारपट्टीवर आढळणारा हम्बोल्ट जातीचे आहेत. हे पेंग्विन समशीतोष्ण वातावरणात राहणारे असल्याने मुंबईतील दमट वातावरणातही ते नीट राहू शकतात. एक ते दीड फूट उंचीचे आणि अवघ्या 5 ते 6 किलो वजनाचे हे पक्षी कळपाने राहतात आणि त्यांचे कुटुंब भराभर वाढते. 30 वर्षांचे आयुर्मान असलेले हे पक्षी वर्षांतून दोनवेळा अंडी घालतात. अंड्यातून 40 दिवसांनी पिलू बाहेर येते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2014 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close