S M L

निवडणूक लढवणं हे ठाकरे कुटुंबाच्या रक्तात नाही -राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Aug 24, 2014 07:11 PM IST

निवडणूक लढवणं हे ठाकरे कुटुंबाच्या रक्तात नाही -राज ठाकरे

24 ऑगस्ट :   विधानसभा निवडणूक लढवण्याची मी घोषणा केली. मात्र निवडणूक लढवणं हे ठाकरे कुटुंबाच्या रक्तात नाही. महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ आहे. आम्ही एका मतदारसंघापुरता विचार करू शकत नाही, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (रविवारी) नागपूरमध्ये होते. या मुलाखतीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. ते कुठून निवडणूक लढवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती, पण याबाबतचा प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले, 'प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी एखाद्या विभागाचा विचार न करता नेहमीच महाराष्ट्राचा विचार केला. मलादेखील एकाच मतदारसंघात अडकून राहणे आवडणार नाही. महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यावर अजूनही विचार सुरू असून पुढचं पुढे बघू, असे सूचक उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याची गर्जना करणार्‍या राज ठाकरेंनी लढण्याआधीच माघार घेतल्याचं दिसत आहे.

निवडणुकांच्या तारखांविषयी निवडणूक आयोग सस्पेन्स का ठेवते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मनसेची ब्ल्यू प्रिंट पुढच्या 10 दिवसांमध्ये जाहीर करणार असून त्यामध्ये विदर्भासाठी विशेष योजना असेल असे राज ठाकरेंनी सांगितले. विदर्भातल्या 40 ते 45 जागा लढवणार असून स्वतंत्र विदर्भाला आमचा विरोध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमांत जर मुख्यमंत्र्यांची हुर्रे होत असेल तर त्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उपस्थित न राहणेच बरं आहे असं सांगत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील वातावरण वेगळे असते. भाजपला लोकसभेत मिळालेल्या यशात राहुल गांधींचं मोलाचं योगदान होतं, असा टोलाही त्यांनी लगावला. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मनसेतील इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेणार नाही असेही त्यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2014 07:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close