S M L

काँग्रेसने फोडला प्रचाराचा नारळ

Sachin Salve | Updated On: Sep 1, 2014 10:13 PM IST

काँग्रेसने फोडला प्रचाराचा नारळ

01 सप्टेंबर 2014 : विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसने आघाडी घेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फोडला आहे. मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर कडाडून टीका करत प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आमच्यावर आरोप करण्याअगोदर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या येडियुरप्पांना भाजपने संसदीय समितीत पद दिले मग ते भ्रष्टाचारी नाहीत का ?, याचे उत्तर भाजपने द्यावं असा खडा सवाल प्रचारसमितीचे प्रमुख नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. तर यापुढे शासकीय कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. या कार्यक्रमात 54 प्रचार ज्योतीचे प्रज्ज्वलन करून प्रचाराला सुरूवात करण्यात आलीय.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर काँग्रेसने विधानसभेसाठी चांगलीच कंबर कसलीये. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने विभागवार समिती स्थापन करुन नियोजनबद्ध प्रचाराची रणनीती आखलीये.  नारायण राणेंनी प्रचारप्रमुखपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मागिल आठवड्यात 1 सप्टेंबरपासून प्रचाराला सुरूवात करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार आज काँग्रेसने प्रचाराचा नाराळ फोडला आहे. आज सकाळी 11 वाजेच्या सुमार काँग्रेसचे प्रमुख नेत्यांनी हुतात्मा चौकात शहिदांना अभिवादन केलं. या ठिकाणी प्रचार ज्योतीचे प्रज्ज्वलन करण्यात आलं. त्यानंतर ही ज्योत आझाद मैदानात झालेल्या कार्यक्रमात आणून महाज्योत पेटवण्यात आली. या महाज्योतीतून राज्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक 54 जिल्ह्यांसाठी 54 ज्योती प्रज्ज्वलीत करण्यात आल्यात. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

येडियुरप्पा भ्रष्टाचारी नाहीत का ? -राणे

काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याअगोदर आपल्या पक्षात काय आहे ही पाहावं आणि मग आमच्यावर आरोप करावा. भाजपमध्ये बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे तरीही त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले आणि त्यांना भाजपच्या संसदीय समितीत जागा ही देण्यात आली. मग ते भ्रष्टाचारी नाहीत का ? ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. भ्रष्टाचारमुक्त राज्य कुठे आहे ? याचे उत्तर भाजपने द्यावं असं आव्हानही राणे यांनी केलं.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाजपचा गोंधळ आता सहन करणार नाही - मुख्यमंत्री

राज्य सरकार आणिकेंद्राचे संबंध काँग्रेस पक्षाने जपून ठेवले. त्याचा आदर राखला, सत्कार केला, प्रोटोकॉल पाळला पण या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पंतप्रधानांचा जिथे कार्यक्रम झाला तिथे दंगा करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडलं. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे आणि हा अपमान आता सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिला. तसंच केंद्राने समन्वय न राखल्यामुळे अनेक संकट आ वासून समोर उभी ठाकली आहे. वीजेसारख्या गंभीर समस्येवर केंद्राचे राज्य सरकारकडे साफ दुर्लक्ष आहे. पंतप्रधानांना याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यात यावी अशी मागणीही केली. पण त्याकडे केंद्राने साफ पाठ फिरवली आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

 कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचीच गर्दी

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, प्रचार समितीचे अध्यक्ष व उद्योगमंत्री नारायण राणे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री मुकूल वासनिक,सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. जनार्दन चांदूरकर, प्रचार समितीचे निमंत्रक आ. मुझफ्फर हुसैन व बसवराज पाटील नागराळकर यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकार्‍यांसह  नेत्यांचीच गर्दी केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2014 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close