S M L

भारत,जपान 'भाई-भाई', बुलेट ट्रेनचं स्वप्न साकारणार !

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2014 01:24 PM IST

भारत,जपान 'भाई-भाई', बुलेट ट्रेनचं स्वप्न साकारणार !

01 सप्टेंबर : भारत आणि जपानाचे संबंध आणखी दृढ होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. जपान दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशीनरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात शिखर परिषद पार पडली. यावेळी गुंतवणुकीवर भर देण्यात आला. त्यानुसार, जपान भारतामध्ये येत्या 5 वर्षांच्या कालावाधीत 2 लाख 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक होणार आहे.

पायाभूत सुविधा, दळणवळण, स्मार्ट शहरं, गंगा आणि इतर नद्यांचं पुनरुज्जीवन, उत्पादनक्षेत्र आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. यावेळी मोदींनी जपान आणि भारताचे राजकीय संबंध आणखी दृढ करण्यावर भर दिला जाईल. जपानमध्ये आल्यामुळे मला नवा उत्साह आणि नवे ध्येय दिसत आहे. भारताबद्दल जपानच्या लोकांमध्ये असलेलं प्रेम पाहून खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली.

भारताच्या पदरात काय ?

मोदी सरकारने पहिल्यावहिल्या रेल्वे बजेटमध्ये बुलेट ट्रेनची घोषणा केली. यासाठी आता जपान यात सिंहाचा वाटा उचलणार आहे. भारताला जपानची बुलेट ट्रेन मिळणार आहे. यासाठी जपान संपूर्ण तंत्रज्ञान, ट्रेनची रचना, इतर बाबींसाठी मदत करणार आहे. त्यानंतर 350 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार्‍या सुसाट बुलेट ट्रेनचं भारताचं स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी किती कालावधी लागणार आहे हे अजून गुलदस्त्यात आहे पण बुलेट ट्रेनचा करार झालाय. त्यापाठोपाठ काशी अर्थात बनारस या शहरांना जपानच्या क्योटा शहराच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे. त्यामुळे काशी आणि बनारसची ओळख मात्र पुसली जाणार नाही पण या शहरांनी आधुनिक शहरांचा खास टच दिला जाणार आहे.

हिंदीतून संवाद

दरम्यान, मोदींनी जपानी उद्योगपतींशी संवाद साधला. भारत आणि जपानने एकत्र काम करून जागतिक अर्थधव्यवस्थेचं नेतृत्व केलं पाहिजे, असं अतिशय सूचक वक्तव्य मोदींनी केलं. जपानी गुंतवणुकदारांचा सहाय्यासाठी पंतप्रधान कार्यालयात विशेष टीम निर्माण करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं. आपल्या पंतप्रधान कार्यालयात जपानी शैलीची शिस्त निर्माण करायचा आपला प्रयत्न आहे, असंही मोदी म्हणाले. विशेष मोदींनी आपलं संपूर्ण भाषण हिंदीतून केलं.

मोदींनी सांगितली विद्यार्थ्यांना कृष्णाची गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानच्या प्रसिद्ध टी सेरेमनीमध्येही सहभाग घेतला. जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी मोदींसाठी हा सोहळा आयोजित केला होता. तसंच मोदींनी टोकियोमध्ये तेईमेई एलिमेंटरी या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधला. विशेष म्हणजे मोदींनी मुलांना कृष्णाची गोष्टही सांगितली आणि त्यांच्यासोबत बासरीही वाजवली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2014 11:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close