S M L

भारतात रेड टेप नाही, तर रेड कार्पेट -मोदी

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2014 09:56 PM IST

भारतात रेड टेप नाही, तर रेड कार्पेट -मोदी

modi in japan 2 sep02 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान-इंडिया असोसिएशनच्या कार्यक्रमात जपानी उद्योगपतींना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं. तुमचं स्वागत रेड टेपनं नाही तर रेड कार्पेटनं केलं जाईल, अशा शब्दांमध्ये मोदींनी उद्योपतींचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. तसंच आपण जपानचे पंतप्रधान आणि सम्राट यांना आपण 'गीते'ची प्रत भेट दिली असंही मोदींनी आवर्जुन सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौर्‍याचा आज चौथा दिवस होता. मोदींनी आज जपानचे सम्राट अकिहितो आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. तसंच जपानचे उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी जपान-इंडिया असोसिएशनच्या कार्यक्रमात जपानी उद्योजकांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं.

भारताची अशी ओळख झालीये की भारतात रेड टेप आहे. सरकारी कामात गाडी चालणार नाही की अशी आशंका उद्योजकांना असते. पण मी तुम्हाला विश्वासान सांगतो भारतात आता रेड टेप नाही तर रेट कार्पेट आहे. त्यामुळे तुमचं स्वागत रेड टेपनं नाही तर रेड कार्पेटवर केलं जाईल, अशा शब्दांमध्ये त्यांनी उद्योपतींचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी वाढलेल्या जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दाखला दिला.

त्यानंतर मोदींनी टीसीएस जपानच्या टेक्नॉलॉजी अँड कल्चरल अकॅडमीला भेट दिली. तिथे त्यांनी तरुण तंत्रज्ञांशी संवाद साधला. मोदींनी त्यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं, तसंच ज्ञानयुगात भारताचं महत्त्व जास्त असल्याचंही सांगितलं. पंतप्रधानांच्या जपान दौर्‍याच्या चौथ्या दिवसाची सांगता झाली ती जपानमधल्या भारतीयांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमानं. या भारतीयांचं कौतुक करतानाच प्रत्येकानं जपानी लोकांना भारत भेटीसाठी प्रोत्साहित करण्याचा मानस करावा, असं आवाहनही केलं. जपानचे पंतप्रधान आणि सम्राट यांना आपण 'गीते'ची प्रत भेट दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

बासरीनंतर आज ड्रम

आपल्या जपान दौर्‍यात पंतप्रधान मोदी रोजच काहीतरी वेगळं करून लोकांचं लक्ष वेधून घेतलंय. सोमवारी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बासरी वाजवून सर्वांना आचंबित केलं. तर आज त्यांनी स्थानिक कलाकारांबरोबर ड्रम वाजवण्याचा प्रयोग केला. पंतप्रधान मोदींसाठी टोकियोमध्ये आज टीसीएसनं एक कार्यक्रम आयोजित केला होता. इथे त्यांच्या स्वागतासाठी ड्रमर्सना बोलवण्यात आलं. यावेळी त्यांनी ड्रमर्सची साथ केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2014 08:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close