S M L

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता

Samruddha Bhambure | Updated On: Sep 4, 2014 03:32 PM IST

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता

04 सप्टेंबर :   महायुतीत जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे पण आता युतीत मानापमानचे नाट्य रंगले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईत दौर्‍यावर येणार आहेत. मात्र शहा 'मातोश्री'वर जाणार का, याबाबत आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा उद्धव ठाकरेंना आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भेटणार असल्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. शहा आणि उद्धव यांची ही सौजन्य भेट असणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गुरुवारी मुंबईच्या एक दिवसाच्या दौर्‍यावर येत आहे. दुपारी बाराच्या सुमारास त्यांचं मुंबई एअरपोर्टवर स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यात आगामी विघानसभा निवडणुकीचा आढावा, जागावाटपावर चर्चा होणार आहे. यानंतर दुपारी अमित शहा विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या घरी जाणार असून संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या सर्व भाजप पदाधिकार्‍यांना षण्मुखानंद हॉलमध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीत नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

पण जेव्हापासून शहांच्या मुंबई दौर्‍याची घोषणा झाली, तेव्हापासून त्यांच्या कार्यक्रमात कुठेही 'मातोश्री'वर जाण्याचा उल्लेखच नव्हता. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही 'मातोश्री' भेटीचा असा कोणताही कार्यक्रम नाही असं स्पष्ट केलं होतं. परंतू अमित शहा यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी अशी अपेक्षा सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2014 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close