S M L

अमित शहांची डायरी खटल्यांनी भरलेली,पवारांनी डागली तोफ

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2014 12:58 PM IST

अमित शहांची डायरी खटल्यांनी भरलेली,पवारांनी डागली तोफ

06 सप्टेंबर : एका पक्षाचे जे अध्यक्ष आहे त्यांचं वैशिष्ट म्हणजे जर त्यांची डायरी तपासली तर किती खटले, कोणत्या कोर्टामध्ये, कुणाच्या पुढे  याची माहिती मिळेल अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता टीका केली. जर त्यांच्या डायरीत अशी जंत्री असेल तर त्यांना 'स्कॅम-स्कॅम' म्हणण्याचा अधिकार आहे का ? असा खडासवालही पवारांनी विचारला. तसंच आमची काँग्रेसशी बोलणी सुरू असून आशा सोडली नाही असं सांगत पवारांनी आघाडीचे संकेत दिले. मुंबईत यशवंत चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीने प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी युतीवर सडकून टीका केली.

दोनच दिवसांपूर्वी भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. आघाडी सरकारने 11 लाख कोटींचा घोटाळा केला असून या सरकारने जनतेला लुटले आहे असा आरोप केला होता. शहा यांचा आरोप राष्ट्रवादीला चांगलाच झोंबला. यावर अजित पवारांनीही आरोप फेटाळून लावत आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं. आज मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटर राष्ट्रवादीने प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी शरद पवारांनी शहांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. एका पक्षाचे जे अध्यक्ष आहे त्यांचं वैशिष्ट म्हणजे जर त्यांची डायरी तपासली तर किती खटले, कोणत्या कोर्टामध्ये, कुणाच्या पुढे याची माहिती मिळेल, जर त्यांच्या डायरीत अशी जंत्री असेल तर त्यांना 'स्कॅम-स्कॅम' म्हणण्याचा अधिकार आहे का ? असा सवालच पवारांनी उपस्थित केला.

'आघाडीची आशा सोडली नाही'

निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे पण अजूनही आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. पण काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे आणि लवकरच निर्णय घेतले जाईल. कदाचित एकत्र कामगिरी सर्वांना करावी लागणार आहे. त्यामुळे जागावाटपाची चिंता करू नका कामाला लागा असे आदेश पवारांनी कार्यकर्त्यांना दिले.

'जिथे गेला तिथे सुखाने नांदा'

मागील महिन्यापासून राष्ट्रवादीला गळती लागलीये. कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकांनी भाजप किंवा शिवसेनेची वाट धरलीये. अलीकडे सूर्यकांता पाटील, बबनराव पाचपुते आणि आज विजयकुमार गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावर पवार म्हणाले, आमच्याकडून जे गेले ते गेले. आता त्यांची चर्चा नको, त्यांचं नाव सुद्धा घेऊ नका, तेवढं महत्व त्यांना देऊ नका. जे गेले त्यांच्यामुळे आपण सुखी झालो. त्यामुळे आपल्यामध्ये काय प्रवृती होती ती तरी कळली. आता जिथे गेला आहात तिथे सुखाने नांदा एवढंच म्हणू शकतो असंही पवार म्हणाले.

पवारांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

- महाराष्ट्रातल्या महिला आघाडीवर आहेत- शरद पवार

- लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सारखाच असतील असं नाही -शरद पवार

- विधानसभेत वेगळा निकाल लागू शकतो - शरद पवार

- भारताच्या माजी सरन्यायाधीशांना केरळच्या राज्यपालपदी बसवलं गेलं

- सरन्यायाधीशांच्या पदाचा मान राखला गेला नाही - शरद पवार

- काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आत्तापर्यंत महाराष्ट्राचा विकास केला

- ही परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे

- शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून द्यायचाय -शरद पवार

- उद्योगांना चांगली बाजारपेठ मिळवून द्यायचीये -शरद पवार

- महिला धोरणाबाबत महाराष्ट्र आघाडीवर -शरद पवार

- महाराष्ट्र हे घोटाळ्यांचे राज्य असल्याचा गैरसमज पसरवला जातोय - शरद पवार

भाजपच्या अध्यक्षांची डायरी जर तपासली त्यात फक्त आगामी खटले आणि तारखांची नावं सापडतील -शरद पवार

- जे गेले त्या घरी सुखाने नांदा - शरद पवार

- जे गेले त्यांची नावंही घेऊ नका

- ही लोकं सोडून गेल्यानं आपण सुखी झालो-पवार

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2014 07:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close