S M L

पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

Sachin Salve | Updated On: Sep 8, 2014 10:29 PM IST

पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

pune ganpati_all08 सप्टेंबर : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि याच पुण्यात लोकमान्य गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सुरूवात केली. आज पुण्यात मोठ्या भक्तीमय वातावरणात जड:अंतकरणाने मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालंय. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीनी पुणेकरांचा निरोप घेतलाय. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्व मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालंय.

पुणेरी ढोल...लेझीम पथक..सळसळत्या तरुणाईचा उत्साह...आणि अखंड पुणेकरांची श्रद्धा..अशा भक्तीमय वातावरणात पुणेरी मानाचे गणपती. देखण्या पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणुका हे पुण्याच्या मिरवणुकांचं खास वैशिष्ट्य. सकाळी मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांना टिळक पुतळ्यापासून सुरूवात झाली.

खास पुणे ढोल ताशाच्या गजरात मानाचे गणपती निघाले. पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची पालखीतून मिरवणूक निघाली. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीला मिरवणुकीत टिळकांनी अग्रस्थान दिलं. तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची पालखीतून मिरवणूक काढली गेली. या मंडळाचं यंदाचं 122 वं वर्ष होतं. मानाचा तिसरा गणपती- गुरुजी तालीम. हे मंडळ पुण्यातलं सगळ्यात जुनं मंडळ समजलं जातं. अतिशय देखण्या अशा या मूर्तीची फुलांच्या रथांतून मिरवणूक काढण्यात आली.

तर मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. विविध फुलांनी सजविलेल्या मयूर रथात हा गणपती विराजमान झाला होता. ढोल-ताशांची पथकं आणि मल्लखांबांची प्रात्यक्षिकं ही या मिरवणुकीची वैशिष्ट्य ठरली. आणि शेवटचा मानाचा पाचवा केसरीवाड्याच्या गणपती. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन दुपारी दोनच्या सुमाराला झालं, त्यानंतर तांबडी जोगेश्वरीच्या गणपतीचं आणि गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन झालं. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचंही विसर्जन झालं. आणि सर्वात शेवटी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक मात्र रात्री उशीरा सुरू राहणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2014 07:30 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close