S M L

आता आमची सटकली, मला राग येतोय - अजित पवार

Sachin Salve | Updated On: Sep 17, 2014 11:11 AM IST

आता आमची सटकली, मला राग येतोय - अजित पवार

ajit pawar in kolhapur news16 सप्टेंबर : आता आमची सटकली आहे, काही झालं तर जनतेला राग येतोय मला राग येतोय. आता अजिबात मागे हटायचं नाही हा डॉयलॉग कुठल्या सिनेमातला नसून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावलाय. कोल्हापुरात राष्ट्रवादीने प्रचाराचे रणशिंग फुंकले यावेळी अजित दादांनी सिंघम स्टाईलने भाजपवर टीका करून एकच धमाल उडवून दिली.

कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आज प्रचाराचं रणशिंग फुंकलं. ज्या कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली त्याच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी आर. आर. पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे आणि शरद पवार या सर्वच नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आणि भाजप, शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना त्यांनी लक्ष केलं. जातीवादाच्या मुद्द्यावर सर्वच नेत्यांनी भाजपला धारेवर धरलं. विशेष म्हणजे आज देशभरातल्या पोटनिवडणुकांचा निकाल आला. यामध्ये भाजपला दणका बसलाय. त्यामुळे तर या नेत्यांचा सूर आणखीनच वरचा होता.

पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्या -शरद पवार

कृषीमंत्री असताना साखर निर्यातीची काळजी घेतली, उसाची किंमत वाढवली, शेतकर्‍याची काळजी घेतली. पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिलीत तर अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुराला पेन्शन देऊ आणि ठिबक सिंचनासाठी 75 टक्क्यापर्यंत अनुदानाची योजना, मागेल त्या शेतकर्‍याला वीज देऊ असं आश्वासनही शरद पवारांनी केलं. तसंच संसदेत भगवी वस्त्रं घातलेले अनेक जण येऊन बसले आहेत. त्यांना देशाच्या भल्याशी देणं- घेणं नाही, धार्मिक तेढ वाढवण्याचं काम ते करतात याची काळजी आपल्याला घेण्याची गरज असून अशी जातीयवादी विचारधारा कधीच राज्यात येऊ देऊ नका असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

ठाकरे घराण्याला मुख्यमंत्रीपद दूरच -तटकरे

शिवसेनेचं काही खरं नाही. उद्धव ठाकरे नांदेडमध्ये मुख्यमंत्रीपदाची आस नाही असं म्हणतात, मुंबईत मुख्यमंत्रीपदासाठी तयार आहे अशी प्रतिक्रिया देतात. पण ठाकरे घराण्याचा कोणताही व्यक्तही मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचू शकत नाही असं परखड मत सुनील तटकरेंनी व्यक्त केलं.

आता आमची सटकली -अजित पवार

आर आर पाटलांचं भाषण ऐकलं, तासगावची मंडळीही इथं आलीये आबांचं भाषण ऐकल्यावर तटकरे साहेब, आता आमची सटकलीये, जनतेला आणि मला राग येतोय अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली. तसंच विनोद तावडे कधी साधे विधानसभेवर निवडून आले नाहीत. तरीही ते गृहमंत्रीपदाची स्वप्नं बघत आहेत असा टोलाही अजित पवारांनी लगावला. तसंच कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आणा असं आवाहन करत पुन्हा सत्तेत आल्यावर 100 दिवसांत कोल्हापूरचा टोल बंद करू असं आवाहनही अजित पवारांनी दिलं.

देवेंद्र फडणवीस म्हणजे दुसरे नाना फडणवीस -भुजबळ

देवेंद्र फडणवीस म्हणजे दुसरे नाना फडणवीस आहे. ओबीसींच्या राजकारणाला तुम्ही नौटंकी कसं म्हणता? असा खडा सवाल भुजबळांनी फडणवीसांना विचारलाय. भाजपमध्ये सगळे उच्चजातीय नेते असून बहुजन समाजाच्या मुंडेंचं सुद्धा अपघाती निधन झालं. मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाला असं पांडुरंग फुंडकरसुद्धा म्हणाले पण तरीही बहुजन समाजाला भाजप निर्णय प्रक्रियेत घेत नाही असा आरोप भुजबळांनी केला. तसंच 'खोटं बोला पण रेटून बोला' ही महायुतीची खोड आहे. अमित शहा म्हणतात, सिंचनात साडेअकरा लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला. गेल्या अनेक वर्षात एवढ्या रक्कमेचं बजेटच झालेलं नाही. भाजपवाले मनमानी आरोप करतायत तेलगी प्रकरणी माझ्यावरही असेच आरोप केले होते पण शेवटी काय झालं हे सर्वांना माहित आहे असंही भुजबळ म्हणाले.

भाजपचं तर 'दाल में कुछ काला नव्हे तर पूर्ण दालच काली' - आर.आर.पाटील

राज्यात भाजपनं आयाराम-गयारामांची संस्कृती रुजवली आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांना भाजपनं पक्षात कसं घेतलं? 'दाल में कुछ काला' नव्हे पूर्ण दालच काली झाली अशी खिल्ली आर.आर.पाटील यांनी उडवलीये. उद्धव ठाकरेंची अवस्था केविलवाणी झालीये आहे. ते बघून स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल? अमित शहांना पायघड्या घालताच कशा? 'भाजप गेली उडत' असं म्हणण्याची शिवसेनेची ताकद नाहीये असा खरमरीत टोला आबांनी लगावला.

आबा एवढ्यावर थांबले नाही तर महायुतीचे नेते अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाले आहेत, लोकसभेच्या यशानं ते हुरळून गेले आहेत. गडकरी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ झाले आहेत, गडकरी पहिल्यांदा महाराष्ट्राचे बना मग मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघा असा समाचारही आबांनी महायुतीच्या नेत्यांचा घेतला. शाहू-फुलेंच्या महाराष्ट्रात जातीयवादी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. महायुतीच्या विचारधारेविरुद्ध सगळ्या पुरोगामींनी एकत्र या, हे जाती-जातीत तेढ आणि धर्मा-धर्मात भांडणं लावतात. हे लोक देशाचे तुकडे पाडायला कमी करणार नाहीत. तर दुसरीकडे फडणवीस आघाडी सरकारचे निर्णय बदलण्याच्या वल्गना करतायेत. आधी सत्तेवर तरी या आणि नंतर निर्णय बदला असा खोचक टोलाही आबांनी फडणवीसांना लगावला. राजू शेट्टी शेतकर्‍यांचा खरा कळवळा असेल तर खासदारकी सोडा आणि हिंमत असेल तर तुमच्याच कृषीमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा. वाटल्यास बिहारमध्ये जायचा रेल्वेचा खर्च आम्ही देतो असा टोलाही आबांनी लगावला.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2014 09:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close