S M L

महायुती टिकवण्याचे संकेत

Samruddha Bhambure | Updated On: Sep 23, 2014 11:43 AM IST

महायुती टिकवण्याचे संकेत

23  सप्टेंबर : शिवसेना-भाजपमधला जागावाटपाचा घोळ अजून सुरूच आहे. शिवेसेनेनं दिलेला प्रस्ताव भाजपला मान्य नसल्यानं युतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण आज सामनातून युती टिकली पाहिजे असे संकेत शिवसेनेकडून देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेत्यांबरोबर आम्ही थोड्याच वेळात बैठक करणार असल्याचं सांगितलं. त्याशिवाय आम्हाला युती अभेद्य ठेवायची आहे अशीही भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबत तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यानंतर आता शिवसेनेचे आणि भाजपचे नेते बैठकीसाठी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात पोहोचले आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई तर भाजपकडून विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत. या बैठकीत योग्य तो तोडगा काढून उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांशी चर्चा करून अंतिम फॉर्म्युला ठरू शकतो. त्यानंतर आज संध्याकाळी युती अभेद्य असल्याची घोषणा होऊ शकते.

दरम्यान, युतीवरून शिवसेना-भाजपमधील संबंध ताणलेले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीत सुरू असलेल्या जागावाटपाच्या तिढ्याबद्दल सामानामधल्या अग्रलेखातून भूमिका मांडण्यात आली आहे. राज्यात सत्ता आणण्यासाठी महायुतीचे घोडे उधळले असून त्यांना अडवणे अशक्य आहे. मात्र जोपर्यंत घोडे जमिनीवरून चालत नाही तोपर्यंत त्याचा काडीचाही उपयोग नाही असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी भाजपला काढला आहे. महायुतीचे कोडे सुटावे यासाठी माणसाने माणसासारखे वागावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीवरून प्रसारमाध्यमांवर टीकास्त्र सोडतानाच भाजपला चिमटा काढला आहे. युती तुटणार की राहणार यावर सट्टा लावला जात आहे. यात प्रसारमाध्यमंही सामील झाल्याचे दिसत असून प्रसारमाध्यमांनी युतीपुढे प्रश्नचिन्ह टाकून गोंधळात भर टाकली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते. त्याच पद्धतीने युती तुटली हीच बातमी होऊ शकते असे प्रसारमाध्यमांना वाटते. महायुतीचे कोडे लवकर सुटणे गरजेचे आहे व त्यासाठी माणसाने माणसासारखेच वागावे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात

शिवसेना- भाजप युतीचे घोडे आता असे उधळले आहेत की त्यास अडवणे कुणाही दुश्मनास शक्य नाही. राज्य आणायचेच हे सगळ्यांचेच मनोरथ आहे. अर्थात मनोरथांना जोडलेल्या- घोड्यांचा वेग किती का असेना, जोपर्यंत ते जमिनीवरून चालत नाहीत तोपर्यंत त्यांचा काडीचाही उपयोग नाही. आधी उत्तर काढून जे सोडविले जाते ते गणित नसून कोडे असते. महाराष्ट्राला पडलेले कोडे लवकर सुटावे ही आई जगदंबेची इच्छा आहे. कोडे सुटत नाही तोपर्यंत माणसाने कुत्र्यास चावावे यासाठी शर्थ केली जाईल. माणसाने माणसासारखे वागावे हा त्यावरचा उपाय आहे. समझनेवालों को इशारा काफी है।

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2014 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close