S M L

महायुतीत ‘अमंगळ’, महाबैठकीतून घटकपक्षांचं ‘वॉकआऊट’

Sachin Salve | Updated On: Sep 24, 2014 01:19 PM IST

महायुतीत ‘अमंगळ’, महाबैठकीतून घटकपक्षांचं ‘वॉकआऊट’

23 सप्टेंबर : होणार…होणार..युती होणार असं युतीच्या नेत्यांनी एकत्र येऊन जाहीर केल्यानंतर आता मात्र महायुतीत मिठाचा खडा पडलाय. महायुतीच्या घटकपक्षांनी कमी जागा दिल्यामुळे नाराजीचे झेंडे फडकावले आहे. घटकपक्षांनी थेट बैठकीतून बाहेर पडून जागावाटप अमान्य असल्याचं सांगितलं. जर महायुतीतून घटक पक्ष बाहेर पडले तर भाजपही युतीतून बाहेर पडेल अशी शक्यता आहे. मात्र अजून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे.

शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची युतीही अभेद्य असून महायुती कायम राहणार असं स्पष्टीकरण भाजपचे नेते विनोद तावडे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवारी) सकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी महायुती कायम राहणार असल्यामुळे सुटकेचा श्वास सोडला होता. ठरल्याप्रमाणे मुंबईत रात्री महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू झाली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, महादेव जानकर उपस्थित होते.

शिवसेनेनं 151-130-7 जागांचा असा प्रस्ताव दिला. यावरच महाबैठकीत चर्चा सुरू झाली पण घटकपक्ष जागावाटपावर नाराज झालेत. त्यांना दिलेल्या 7 जागांवर घटक पक्ष असमाधानी आहेत. आम्हालाही विचारात घ्या, असं घटकपक्षांचं म्हणणं आहे. शिवसेनेनं आपला 150च्या जागांचा आग्रह सोडावा असंही घटकपक्षांचं म्हणणं आहे. पण वाद चिघळल्यामुळे राजू शेट्टी, महादेव जानकर आणि रामदास आठवले या बैठकीतून बाहेर पडलेत. आता घटकपक्ष जर महायुतीतून बाहेर पडले तर भाजपही बाहेर पडेल अशी शक्यता आहे.

शिवसेनेनं दिलेल्या प्रस्तावानुसार शिवसेना 150, भाजप 130 तर मित्रपक्ष 7 जागा असा फॉर्म्युला आहे. शिवसेना आणि भाजप आपल्या कोट्यातील प्रत्येकी 5 ते 6 जागा मित्रपक्षांना सोडणार आहे. अशा घटक पक्षांना 17 जागा सोडण्यात येतील, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू असेल. प्रत्येक जागांबाबत चर्चा होत आहे. मित्र पक्षही रात्री चर्चेत सामील होणार आहेत अशी माहिती सुधीर मुणगंटीवार यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2014 11:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close