S M L

शेट्टी, जानकर, मेटेंचा एकत्र लढण्याचा इशारा

Samruddha Bhambure | Updated On: Sep 24, 2014 01:18 PM IST

शेट्टी, जानकर, मेटेंचा एकत्र लढण्याचा इशारा

24 सप्टेंबर : शिवसेना-भाजपने जागावाटपात महायुतीतील घटकपक्षांना केवळ 7 जागा देऊ केल्याने कमालीचे नाराज झालेल्या घटकपक्षांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर व शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे हे हजर होते. या बैठकीत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घटकपक्षांच्या नेत्यांनी घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. आज सायंकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करू, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी शिवसेना आणि भाजपनं आम्हाला महायुतीत घेतल्याचा आरोप करत महायुतीत सामील झाल्याबद्दल जनतेनं आम्हाला माफ करावं असं सदाभाऊ खोत म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेने आपली युती कायम असल्याचं जाहीर केलं खरं पण आता घटक पक्ष मात्र नाराज झाले आहेत. महायुतीनं घटक पक्षांसमोर शिवसेना 151, भाजप 130 आणि घटक पक्षांना 7 जागांचा फॉर्म्युला दिला आहे. पण घटक पक्ष फक्त 7 जागा मिळाल्यानं कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

याच संदर्भात चर्चा करण्यासाठी घटकपक्षांची आज मुंबईतल्या मॅजेस्टिक इथे बैठक झाली. या बैठकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम असल्याची भूमिका घटकपक्षांनी मांडली आहे. भाजप व शिवसेना आमच्यासारख्या छोट्या घटकपक्षांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला 7 जागा देणारे तुम्ही कोण होता? आता आम्ही चौघं महायुती बनवतो आणि तुम्हाला जागा वाटतो,' अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी काल रात्री झालेल्या बैठकीनंतर दिली आहे.

दरम्यान, काहीवेळा पूर्वी देवेंद्र फडवणीस विनायक मेटेंची भेट घेतली. 'घटक पक्षांना सोडून आम्ही पुढे जावू शकत नाही, घटक पक्षांची साथ महत्त्वाची, महायुतीच्या जागावाटपावर लवकरात लवकर निर्णय व्हावा हीच आमची इच्छा असल्याचं देवेंद्र फडवणीसांनी सांगितलं आहे तर आज सकाळपासून शिवसेनेनं आम्हाला संपर्क केलेला नाही, असं विनायक मेटेंनी सांगितलं आहे. आता जागावाटपाबद्दल घटक पक्ष आणि शिवसेना-भाजपच्या नेत्यांची आज पुन्हा बैठक होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2014 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close