S M L

सेनेनं युती तोडली नाही,भाजपनं तोडलं हिंदुत्वाचं नातं -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Sep 28, 2014 01:29 AM IST

सेनेनं युती तोडली नाही,भाजपनं तोडलं हिंदुत्वाचं नातं -उद्धव ठाकरे

27 सप्टेंबर : गेल्या 25 वर्षांची ही युती तुटली त्याचा मला मुळीच आनंद नाही, मला ही दु:ख झालं. महाराष्ट्राच्या जनतेनं सोन्यासारखं ताट भरून दिलं होतं पण ही युती तुटली. आम्ही युती तोडली नाही. भाजपने युती तोडली नाही तर हिंदुत्वाशी नातं तोडलंय अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. तसंच राज्यात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल आणि तो मी करून दाखवणारच अशी गर्जनाही उद्धव यांनी केली. आज आपल्यासोबत कोण आहे कोण नाही याचा हिशेब नाही पण रामदास आठवले तुम्हीसोबत या तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ असं जाहीर आवाहनही उद्धव यांनी केलं.

अरे आवाजsss कुणाचा फक्त शिवसेनेचा... या गगनभेदी गर्जनेनं युती तुटल्यानंतर शिवसेनेची पहिली सभा मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर पार पडली. या सभेला शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार ? भाजपचा कसा समाचार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली. गेल्या 25 वर्षांपासून ही युती आम्ही नेमाने टिकवली. 25 वर्ष खूप काही साचवून ठेवलंय पण आज यावर बोलणार असं सांगून उद्धव यांनी भाषणाला सुरूवात केली. भाजपच्या नेत्यांच्या आठमुठेपणामुळे आज होत्याचं नव्हतं झालं. रंगशारदामध्ये बैठक झाली होती तेव्हाच आम्ही 150 जागा घेणार असं स्पष्ट ठणकावून सांगितलं होतं. पण भाजपच्या नेत्यांनी खेचाखेची सुरू केली. आम्ही आमच्या वाट्यातून घटकपक्षांना 18 जागा दिल्यात पण भाजपने आपल्या गोटातून एक जागाही देण्यास तयारी दाखवली नाही. आज कोणत्याही पक्षाला 30 -35 जागा सोडणं शक्य नाही. आम्हीही तेच केलं. शिवसेना काही जागांचं गोडाऊन नाही. वाटेल ते मागायला किंवा हे बुटाचं दुकानही नाही. हा जोडा पायात बसला नाहीतर लगेल दुसरा मागवायला. जर मी युती तोडली असं कुणाला वाटत असेल तर अवघ्या महाराष्ट्राची मगी माफी मागतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वाघ हा वाघच असतो -उद्धव ठाकरे

युती तुटल्याच्या दिवशी एकनाथ खडसे यांचा फोन आला होता. युती तुटतेय याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली होती. दुर्देवाने युती तुटली नाही तर सुदैवाने हे नातं तुटलंय. पूर्वीही वाद झाले पण असे वाद झाले नाहीत. ज्या मांजराच्या गळ्यात घंटा घालायला निघाले होते. ती मांजर नाही तर वाघ आहे आणि वाघ हा वाघच राहतो. आता या वाघाच्या गळ्यातील घंटा राज्यभर घंटानाद करून तुम्हाला आता तुमची जागा दाखवून देऊ असा इशाराही उद्धव यांनी दिला.

'गोपीनाथ मुंडे पाहिजे होते'

युती तुटली याचं दु:ख आहेच पण आज गोपीनाथ मुंडे पाहिजे होते ते जर असते तर असं झालं नसतं. बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांची आठवण आज येत आहे या नेत्यांनी हा संसार थाटला होता पण आजही युती तुटली. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता पुन्हा नाही अशी आठवणही उद्धव यांनी काढलीय.

'मोदी झालेना पंतप्रधान'

नरेंद्र मोदी यांची लोकसभेत लाट होती. ती आम्हाला मान्य आहे आम्ही कुठे नाही म्हणालो मोदी लाट नव्हती. त्यामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा दिला. मोदींसाठी आम्हीही झटलो. त्यामुळेच तर मोदी आज पंतप्रधानपदावर बसले आहे. ज्यावेळेस गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. तेव्हा मोदींना हटवा अशी मागणी होत होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे मोदींच्या पाठीशी उभे राहिले. मोदी गेले तर गुजरात हातचा जाईल असं बाळासाहेब म्हणाले होते अशी आठवणंही उद्धव यांनी करून दिली.

'पंकजा मुंडेंच्या विरोधात शिवसेना लढणार नाही'

भाजपने जरी युती तोडली असली तरी पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. पंकजा, कधीही हाक मार हा भाऊ तुझ्या पाठीशी धावून येईल. राजकारण एका बाजूला राहिलं पण हा भाऊ कधीच आपल्या बहिणीच्या विरोधात लढणार नाही. आणि शिवसेनेला हे जमणार ही नाही. म्हणूनच शिवसेना सगळ्या जागेवर लढेल पण पंकजा आणि प्रितम यांच्या विरोधात शिवसेना लढणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

'शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच'

मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे कुठला अनुभव आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, तर तुम्ही मुख्यमंत्री होते तर का फाईली पुढे सरकल्या नाही. का हाताला लकवा भरला होता. का निर्णय योग्यवेळेवर घेतले नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी अनुभवाची गरज नाही तर इच्छाशक्तीची गरज आहे. येणार्‍या 20 दिवसात शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार मला काही मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत नाही.त्यासाठी मी काही स्वप्नपिपासू नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार आहे. आता शपथ घेऊन मैदानात उतरलोय, सोबत कोण आहे कोण नाही यावेळी ही निष्ठेची कसोटी आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'आठवले परत या'

आता कोण गेले याचं मोजमाप कऱणार नाही. पण रामदास आठवले ही शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र राहिली पाहिजे. तुम्ही परत या तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ असं जाहीर आवाहन उद्धव यांना रामदास आठवलेंना केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2014 10:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close