S M L

बाळासाहेब असते तर कधीच युती तोडली असती- राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Sep 29, 2014 12:07 PM IST

बाळासाहेब असते तर कधीच युती तोडली असती- राज ठाकरे

5537008925162439537_Org

28 सप्टेंबर : बाळासाहेब असते तर कधीच युती तोडली असती, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपला लक्ष्य केलं. मनसेचा नेता पळवताना तुम्हाला लाज का नाही वाटली, असंही त्यांनी म्हटलं आहे. रविवारी कांदिवली येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. पहिल्याच जाहीर सभेत राज ठाकरेंनी युती आणि आघाडीवर जोरदार टीका केली. तसंच गेल्या दोन दिवसांत झालेल्या पक्षांतरावरूनही टोला हाणला. सध्या प्रत्येकजण पक्षांतर करत असून राजकारणाचा बाजार मांडला आहे, असे सांगत राज ठाकरेंनी बंडखोरांची खिल्ली उडवली.

गेले काही दिवस आजारी होतो पण तरी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय तमाशाकडे माझं लक्ष होतं. 25 वर्षं जुनी युती तुटली. पण शिवसेनेने भाजपसमोर लाचारी दाखवली. भाजपने शिवसेनेचा अपमान केला आहे. आज बाळासाहेब असते तर कधीच युती तोडली असती असे राज ठाकरे म्हणाले.

भाजप विश्वास न ठेवता येणारा पक्ष असून शिवसेनेचा अपमान झाला असताना, केंद्रातलं मंत्रिपद का ठेवलं, मुंबई महापालिकेतील युती का ठेवली? लाथ मारायला हवी होती, असेही राज म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते अतुल भातखळखर आणि सदाशिव लोखंडे यांना मनसेमध्ये यायचे होते. मात्र मी त्यांची समजूत काढून त्यांना भाजपमध्येच राहण्याची विनंती केली. गडकरींशी संपर्क साधून त्यांनाही हा प्रकार सांगितला, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. पण माझ्या या भूमिकेचा भाजपला विसर पडला. आता भाजपला मनसेचा नेता पळवताना लाज वाटली नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेने रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, हे ऐकून आठवलेंच्या कुटुंबीयांनाही हसू आलं असेल, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. या सर्व राजकीय गोंधळात यंदाच्या निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळाले नाही तर राज्य 15 वर्षं मागे जाईल, अशी भीतीही राज ठाकरेंनी वर्तवली. जनतेने यंदा मनसेच्या हातात संधी दिल्यास स्वाभिमान काय असतो हे दाखवून देईन, महाराष्ट्राला स्वायत्तता मिळायला हवी, महाराष्ट्र सक्षम असून त्याला केंद्र सरकारची गरज नाही, असा पुनरुच्चारही राज ठाकरेंनी केला.

मनसेची ब्ल्यू प्रिंट म्हणजे वचन

मनसेची ब्ल्यू प्रिंट हे वचन आहे. राज्यात वीज, पाणी देऊ नाही तर ते देणारच, हे माझे वचन आहे. यासाठी आमच्याकडे आराखडेही तयार आहेत, असे राज ठाकरेंनी सांगितले. राज्यात मनसेची सत्ता आल्यास परप्रांतातून येणार्‍यांवर करडी नजर ठेऊ, सर्वसामान्यांना स्वस्तात घरं उपलब्ध करुन देऊ, सत्ता आल्यावर मनसेचा पहिला दिवस म्हणजे नवीन झोपडपट्टीचा शेवटचा दिवस असेल, अशी घोषणाही त्यांनी केली. जनतेने सर्व पक्षांना दूर साधून मनसेला एकहाती सत्ता द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

Follow @ibnlokmattv

कधीच युती तोडली असती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2014 09:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close