S M L

पवारांना पराभव माहित होता म्हणून लोकसभा लढले नाही -मोदी

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2014 08:15 PM IST

पवारांना पराभव माहित होता म्हणून लोकसभा लढले नाही -मोदी

narendra modi gondiya speech05 ऑक्टोबर : शरद पवार चतूर आहेत त्यांना माहित होतं आपली नाव डुबणार होती म्हणून ते लोकसभा लढले नाही आणि प्रफुल्ल पटेल यांना बळीचा बकरा बनवला असा खणखणीत टोला भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना लगावला. तसंच गेली पंधरा

वर्ष 'चोर-लुटेरे भाई भाई' असं करून यांनी महाराष्ट्र लुटला अशी जळजळीत टीकाही मोदींनी केली. ते गोंदियात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावलाय. आज त्यांनी तासगाव, कोल्हापूर आणि त्यानंतर गोंदियामध्ये सभा घेतल्या. भाषणाच्या सुरूवातीला मोदींनी लोकसभा निवडणुकीत विश्वास टाकल्याबद्दल गोंदियाकरांचे आभार मानले. सबका साथ सबका विकास हा नारा देत महाराष्ट्र पुढे गेला तर देश पुढे जाईल असा नारा मोदींनी दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर हल्ला चढवत त्यांनी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष केलं. राष्ट्रवादीची घडी जिथेच्या तिथेच आहे. जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा त्यांच्या घडीमध्ये 10 वाजून 10 मिनिटं होते ते आजही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राला लुटले आहे. काँग्रेसने 60 वर्षात कोट्यवधी खर्च केलेत पण आदिवासींची स्थिती जैसे थेच आहे. हे पैसे गेले कुठे ? मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. राष्ट्रवादी नव्हे तर भ्रष्टाचारवादी आहे अशी टीकाही त्यांनी पुन्हा केली. आता आघाडीचे दिवस संपले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे. खरं म्हणजे राज्यात मिळणार्‍या प्रतिसादामुळेच विरोधक हादरले. त्यात शरद पवार हे चतूर नेते निघाले. लोकसभेत पराभवाच्या भीतीमुळे उभे राहिलेच नाही. प्रफुल्ल पटेल यांना बळीचा बकरा केला आणि पुढे केलं शेवटी काय झालं पटेल पराभूत झाले असा टोलाही मोदींनी लगावला. देशात महागाईचा दर कमी झालाय, असं सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक केलं. भाजपला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी मोदी 25 सभा घेणार आहेत. या प्रचारातही मोदींचं स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. प्रत्येक सभा संपल्यानंतर मोदी सगळ्यांना सभेच्या ठिकाणची स्वच्छता करण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, त्याअगोदर सांगलीमध्ये तासगाव इथं झालेल्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला प्रचंड आदर आहे, ते नसताना ही निवडणूक होतेय. त्यामुळे मी शिवसेनेवर अजिबात टीका करणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2014 08:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close