S M L

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?, राज ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2014 01:05 PM IST

756858raj06 ऑक्टोबर : भाजपच्या जाहिरातीवरुन सोशल मीडिया आणि व्हॉटसऍप कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? यावरील जोक्सने धुमाकूळ घातला आहे. आज (सोमवारी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? गुजरातला ठेवलाय का ? असा खोचक टोला लगावत भाजपच्या जाहिरातींचा चांगलाच समाचार घेतला. तसंच सीमारेषेवर पाकिस्तान कडून गोळीबार सुरू आहे आपले जवान शहीद होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेत मग्न झाले आहे अशी विखारी टीकाही राज यांनी केली. उद्या जर शरद पवार मोदींच्या मंत्रिमंडळात दिसले तर आश्चर्य वाटू नये असा आरोपही राज यांनी केला. डोंबिवली इथं राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. आज मुंबईत डोंबिवली मतदारसंघात राज ठाकरेंची भव्य सभा पार पडलीय. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आसूड ओढला. भाजपने जाहिरात केली अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ? मोदींच्या मर्जीतल्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल मुंबईत येऊन उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचं आमंत्रण देतायत. मुंबईतले अनेक प्रकल्प गुजरातला पळवले जात आहे. तिथे नेऊन ठेवलाय का महाराष्ट्र माझा ? असा सवाल करत राज यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरलं.

अजित पवारांवर टीकास्त्र

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. अजित पवार आता प्रचाराला फिरत आहे. इतके सगळे घोटाळे करून हे कसे काय उजळं माथ्याने फिरतायत. मतं मागायला काही कसं वाटतं नाही या नेत्यांना यांना जनताच धडा शिकवले असा टोला राज यांनी पवारांना लगावला.

हेच का अच्छे दिन ?

त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वळवला. आज सीमारेषेवर गोळीबार सुरू आहे. जीवाची बाजी लावून आपले जवान धारातीर्थ पडत आहे पण पंतप्रधानांना याचं काहीही घेणं देणं नाही. पंतप्रधान राज्यात प्रचारात मग्न आहे हेच का ते अच्छे दिन ? असा खोचक टोलाही त्यांनी मोदींना लगावला.

युती-आघाडी तुटण्याचं प्लॅनिंग होतं

ऐन अर्ज भरण्याच्या दोन दिवसांअगोदर युती-आघाडी कशी तुटली. हे सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं. पवारांनी भाजपच्या नेत्यांना फोन करून सांगितलं होतं तुम्ही युती तोडा आम्ही आघाडी तोडू आणि तसंच झालं. दोनच दिवसांत यांना एबी फॉर्मही बरोबर मिळाले. सर्व उमेदवारांनी बरोबर दुसर्‍या दिवशी फॉर्म भरून मोकळे झाले. हे सगळं अगोदरच ठरलं होतं लोकांना यांनी मूर्ख बनवलंय असं ही राज ठाकरे म्हणाले. केंद्रात युती राहणार, पालिकेत युती राहणार इथं मात्र युती तुटणार हे कसं काय ? सगळं आपआपल्या सोयीने चालू आहे.

जसे काँग्रेस राष्ट्रवादी तसेच शिवसेना भाजप आहे अशी टीकाही सेनेवर केली.

'शरद पवार मोदींच्या मंत्रिमंडळात दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका'

मोदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करायला महाराष्ट्रात फिरत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं असून उद्या जर शरद पवार मोदींच्या मंत्रिमंडळात दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका असा आरोपही त्यांनी केला. राज यांनी पुन्हा टोलवरून हल्लाबोल केला. मनसेनं आंदोलन केलं म्हणून 44 टोल बंद झाले. एकनाथ खडसेंना फोन केला होता तेव्हा त्यांनी सहकार्य केलं नाही. विधानसभेतही ही लोकं बोलत नाही तासंतासं खडसे भाषण करत असता जर भाषणं करायचीच असेल तर आस्था चॅनेलवर जा असा टोलाही राज यांनी लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2014 11:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close