S M L

शाब्दिक युद्ध ; मोदी विरुद्ध ठाकरे, मोदी विरुद्ध पवार !

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2014 10:33 PM IST

शाब्दिक युद्ध ; मोदी विरुद्ध ठाकरे, मोदी विरुद्ध पवार !

07 ऑक्टोबर : लोकसभेत मोदी विरुद्ध गांधी सामना अवघ्या देशाने पाहिला. पण राज्यातील विधानसभा निवडणुकीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध ठाकरे बंधू, पवार कुटुंबीय आणि काँग्रेस असा रंगलाय. मोदींच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे आणि मोदींच्या आक्रमक भाषणामुळे सर्वच पक्षांच्या टार्गेट मोदी ठरले आहेत. महाराष्ट्र जिंकायला अफजल खानाची फौज आलीय, नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी आलेत, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. तर अजित पवारांनी तर मोदी आणि त्यांच्या मातोश्रींच्या भेटीवर टीका केली. हेच नाहीतर शरद पवारांनी मोदींवर सडकून टीका केलीय. मोदी विरुद्ध दिवसभर रंगलेला सामना कसा होता त्याचा हा आढावा...

धुळे मोदींची सभा - पंतप्रधान असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही -मोदी

जोपर्यंत मी दिल्लीत सत्तेवर आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईशिवाय महाराष्ट्र अपूर्ण असून देशाला पुढे नेण्याची ताकद फक्त महाराष्ट्रात आहे असंही मोदी म्हणाले. 15 वर्षांत महाराष्ट्रात 2 पिढ्या बरबाद केल्या, घोटाळे केले, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे. तसचं मी गरिबीत वाढलो आहे त्यामुळे गरिबांचं दु:ख मी जाणतो, त्यासाठी झोपडीत जाऊन फोटो काढण्याची मला गरज नाही, असा टोला मोदींनी नाव न घेता राहुल गांधींना लगावला.

बीड- उद्धव ठाकरेंची सभा - छत्रपतींचा आशीर्वाद कशाला ? महाराष्ट्र तोडायला -उद्धव ठाकरे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे. आज बीडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. मी भाजप विरोधात बोलणारच. एका बाजूला महाराष्ट्र तोडणारे भाजपवाले बसले आहे आणि धुळ्यात मोदी म्हणतात, मी जोपर्यंत पंतप्रधानपदावर आहे तोपर्यंत महाराष्ट्र तुटू देणार नाही. त्यांचं म्हणणं मानलं. पण दुसरीकडे 10 मिनिटांच्या आता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये म्हणतात मोदी मुंबईबद्दल बोलले होते. आम्ही विदर्भ वेगळा करणार म्हणजे करणारच, महाराष्ट्र तोडणारच ही एकीकडे लुटालूट आणि तोडणार्‍यांची टोळी बसलेली आहे त्यांना मतदान करणार का ? शिवरायांचा आशीर्वाद पाहिजे यांना महाराष्ट्र तोडण्यासाठी आशीर्वाद पाहिजे का ? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

नाशिक -मायावतींची सभा : कुठे आहे अच्छे दिन ? - मायावती

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत मायावतींनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर भाजपवरही सडकून टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिनची आश्वासनं दिली होती. पण कुठे आले अच्छे दिन असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींनी मोदींना केलाय. इतर पक्षांसारखे आम्ही फसवे जाहीरनामे प्रकाशित करत नाही. आम्ही कृती करुन दाखवतो असंही मायावतींनी म्हटलंय.

 बीड - आईच्या भेटीचं मार्केटिंग का करता ? - अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी आपल्या आईला भेटायला अहमदाबादमध्ये जात असता. मोदी आणि त्यांच्या आईंच्या भेटीवर अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. काही लोकांना मीडियाची सवय झालीये. निव्वळ स्वत:काही करतो त्याचं मार्केटिंग करायचंय. माझीही आई काटेवाडीला राहते. 75 वर्ष वय आहे तिचं. मी मुंबईला असतो आणि पाच वेळा निवडून आलोय. कधीकधी बारामतीला आल्यावर आईला भेटतो. तब्येतीची विचारपूस करतो. ती पण माझी विचारपूस करते. पण मी काटेवाडीत माझ्या घरी गेल्यावर घराबाहेर दोन खुर्च्या टाकत नाही आणि मीडियाला बोलवतं नाही. कॅमेर्‍यावाल्यांना बोलवत नाही. सगळ्या भारताला दाखवत नाही की, किती आईची विचारपूस चालू आहे हे सगळं कोण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी करता असता. अरे तुम्ही आईला भेटायचं तर घरात भेटाना दरवाज्याच्या बाहेर येऊन पब्लिसिटी करण्याचं काय काम आहे असा टोला अजित पवारांनी लगावला. आता तुम्ही पब्लिक फिगर आहात तुमच्या पत्नीबद्दल काय उत्तर आहे. तुम्हाला कुणीविचारला तर काय सांगाल हीच का तुमची महिलाबद्दलची आस्था आहे. याबद्दल त्यांनी उत्तर दिलं पाहिजे अशी टीकाही पवारांनी केली.

वर्धा - शरद पवारांची सभा : मोदी सभा घेऊ शकता ?- शरद पवार

पाकिस्तानने सारखं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. अजूनही सीमारेषेवर गोळीबार सुरू आहे आण सिीमेवर जवान शहीद होतायत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेत फिरतायत अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली. कापसाचे भाव 3 हजारांच्या वर जाऊ शकत नाहीत याचं दु:खही खूप आहे. वर्धा जिल्हा बँकेचा प्रश्न हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे. पण आचारसंहितेमुळे प्रश्न निकाली काढता आला नाही. पण निवडून दिल्यास त्याला प्राधान्य देऊ असं आश्वासन शरद पवार यांनी दिलंय.

नागपूर - मोदींची सभा - मोदींनी टीका टाळली

नरेंद्र मोदींनी संध्याकाळी नागपूरमध्ये सभा घेतली. पण या सभेत त्यांनी विदर्भाच्या मुद्द्याचा उल्लेख केला नाही. देवेंद्र फडणवीस आणि खासदार हंसराज अहिर यांचं मोदींनी यावेळी तोंडभरून कौतुक केलं तर पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा उल्लेख मात्र त्यांनी केला. 14 तारखेपासून पंडित नेहरूंच्या जन्मदिनापासून 19 तारखेला इंदिरा गांधींच्या जन्मदिनापर्यंत स्वच्छता दिन पाळण्याची घोषणा मोदींनी केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 10:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close