S M L

राहुल बाबा चुकले, पंतप्रधानांना विरोधी पक्षनेते बोलले !

Sachin Salve | Updated On: Oct 8, 2014 08:22 PM IST

राहुल बाबा चुकले, पंतप्रधानांना विरोधी पक्षनेते बोलले !

08 ऑक्टोबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राज्यात प्रचाराला सुरुवात केली खरी पण लोकसभेतल्या दारूण पराभवानंतरही राहुल गांधीना मात्र आपण विरोधी पक्षात आहोत असं अजूनही वाटत नाहीये. कारण सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता विरोधी पक्षनेते 60 वर्षात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणातात अशी टीका केली. तसंच विरोधी पक्ष काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करतोय असंही त्यांनी मोदींच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन सांगितलं.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज प्रचारात मैदानात उतरले. रायगड जिल्ह्यात महाडमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधींनी भाजपवर तोफ डागली. महाराष्ट्र सर्व क्षेत्रात गुजरातच्या पुढे आहे, पण तरीही भाजपचे नेते महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करत आहे. काँग्रेस असताना असा कोणताही मुद्दा उपस्थित केला गेला नाही. पण आपलं सरकार येणार असा गैरसमज या लोकांचा झालाय त्यामुळे ते अशी विधान करत आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मोदींकडे वळवला. मात्र यावेळी त्यांनी भलताच राडा केला. आपण अजूनही सत्तेत आहोत असा गैरसमज राहुल गांधींना झाला असावा. त्यांनी सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता विरोधी पक्षनेते 60 वर्षात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणतात अशी टीका केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर तसंच विरोधी पक्ष काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करतोय असं जाहीरपणे सांगून मोकळे झाले. मात्र आपली चूक लक्ष्यात आल्यानंतर पुढे त्यांनी तोल सांभाळला. पंतप्रधान मोदी अमेरिका दौर्‍याला जाणार होते. त्यांच्या या दौर्‍याच्या अगोदर त्यांनी औषध कंपन्यांबरोबर हातमिळवणी केली, त्यानंतर औषधांच्या नियंत्रित किंमती खुल्या केल्या त्यामुळे काही दिवसातच डायबेटीस, कॅन्सर औषधांच्या किंमती वाढतील असा गंभीर आरोप राहुल यांनी केली. चीन भारतात जी घुसखोरी करतंय त्याबाबत पंतप्रधान गप्प का ? पाकिस्तान जे अतिक्रमणआणि हल्ले करतंय त्याबद्दल पंतप्रधान काही करत का नाहीत? असा सवालही उपस्थित केला. हा देश एकटा कुणीही चालवू शकत नाही. पण मोदी महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, पटेल यांची उदाहरण देत आहे. पण हा देश सर्वसामान्य जनतेनं मोठा केलाय असंही राहुल म्हणाले. तसंच मोदींचं मार्केटिंग चांगलं आहे पण काम मात्र काहीच नाही. पृथ्वीराज चव्हाण हे चांगले नेते आहेत, ते मार्केटिंगवाले नाहीत असं सांगत त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर स्तुतीसुमनं उधळली. तसंच काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास मोफत औषधं देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं

भाषणातील ठळक मुद्दे

- पंतप्रधानांनी अमेरिकेच्या मेडिसीन कंपन्यांसोबत हातमिळवणी केली

- औषधांच्या नियंत्रित किंमती खुल्या केल्या

- काही दिवसातच डायबेटीस, कॅन्सर औषधांच्या किंमती वाढतील

- दुष्काळात काँग्रेसने लोकांना मदत केली

- वीज बील माफ केलं, राजीवगांधी जीवनदायी योजना दिली

- चीन भारतात जी घुसखोरी करतंय त्याबाबत पंतप्रधान गप्प का?

- पाकिस्तान जे अतिक्रमण आणि हल्ले करतंय त्याबद्दल पंतप्रधान काही करत का नाहीत?

- मोदींचं मार्केटिंग चांगलं आहे पण करत काहीच नाही

- पृथ्वीराज चव्हाण चांगले नेते आहेत, मार्केटिंगवाले नाहीत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close