S M L

पैशांचा महापूर थांबता थांबेना...

Sachin Salve | Updated On: Oct 11, 2014 02:02 PM IST

पैशांचा महापूर थांबता थांबेना...

11 ऑक्टोबर : मतदानाला अवघे चार दिवसं उरले असताना राज्यात निवडणुकीच्या काळात पैशांचा महापूर थांबता थांबेना. इंदापूर, पंढरपूर,अमळनेर, बुलडाणा,नागपूर,दहिसर,पंढरपूर,धुळे,डोंबिवली,पुणे,डहाणू, औरंगाबाद,नंदूरबार, बीड आणि परभणीमध्ये कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आलीये. शुक्रवारपर्यंत राज्यभरात तब्बल 10 कोटी 93 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी सापडलेली रोकड ही बँकेची असल्याचं सांगितलं जात आहे पण काही ठिकाणी तर ही रोकड कुणाची, कुठून आली याचा थांगपत्ता लागत नाहीये.

शिरूरमध्ये अडीच कोटींची रोकड सापडली

पुण्याजवळ शिरूरमध्ये शुक्रवारी रात्री तब्बल अडीच कोटींची रोकड सापडली आहे. निवडणूक भरारी पथकानी शिरूर- हवेली मतदारसंघात कारवाई केली आहे. ही रक्कम पुणे जिल्हा सहकारी बँकेची असल्याची माहिती शिरूरच्या नायब तहसीलदारांनी दिली. बँकेच्या मुख्य शाखेतून ही रक्कम इंदापूरला नेली जात असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. पण याबद्दलची कोणतीही कागदपत्रं सापडली नाही आहेत.

जळगावात 80 लाख जप्त

जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये शुक्रवारी रात्री पोलिसांनी पाटील प्लाझा हॉटेलवर धाड टाकून केलेल्या कारवाईत 80 लाख जप्त करण्यात आले आहेत. या हॉटेलच्या एका रूममध्ये ही रक्कम तीन बॅगांमध्ये सापडली. पण निवडणूक अधिकार्‍यांनी झडती घेतल्यावर त्यांना फक्त 62 लाख रुपयेच सापडले त्यानंतर सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर रूममध्येच पलंगाच्या खाली बॅगेत उरलेले 18 लाख रूपये सापडले. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरच संशय व्यक्त होतं आहे.

इंदापूरजवळ काळेवाडीत तब्बल 5 कोटींची रोकड सापडली

इंदापूरजवळ काळेवाडीत तब्बल 5 कोटींची रोकड निवडणुकीच्या भरारी पथकानं पकडली होती. पण ही रक्कम सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची असल्याचं समजतंय. रोकड सापडल्यानंतर बँकेकडून कागदपत्रं मागवण्यात आली होती. इंदापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी ही माहिती दिली.

बुलडाण्यात 80 लाखांची रोकड जप्त

बुलडाणा जिल्ह्यात भोकरवाडीजवळ 80 लाखांची रोकड सापडलीय. एका कारमध्ये गोण्यांमध्ये ही रक्कम आढळली. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केलीये.

नागपूरमध्ये 70 लाख जप्त

नागपूरमधल्या महाल परिसरातून 70 लाख जप्त करण्यात आले आहेत. एका गाडीतून हे पैसे जप्त करण्यात आले आहेत. या गाडीच्या ड्रायव्हर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मालकाचा शोध सुरू आहे. ही रक्कम पुष्पा अगरवाल नावाच्या काँट्रॅक्टरची असल्याचं आढळून आलंय. अधिक चौकशी सुरू आहे.

कोटीच्या कोटी उड्डाणं -10.93 कोटी जप्त

 • - इंदापूर - 5 कोटी
 • - पंढरपूर - 1 कोटी
 • - अमळनेर - 1 कोटी
 • - बुलडाणा - 80 लाख
 • - नागपूर - 70 लाख
 • - दहिसर - 50 लाख
 • - पंढरपूर - 40 लाख
 • - धुळे - 36 लाख
 • - डोंबिवली - 35 लाख
 • - पुणे - 20 लाख 48 हजार
 • - डहाणू - 16 लाख 50 हजार
 • - फुलंब्री, औरंगाबाद - 16 लाख
 • - नंदूरबार - 11 लाख
 • - सेलू, बीड - 7 लाख
 • - माजलगाव, बीड - 5 लाख
 • - परभणी - 4 लाख 85 हजार
 • - तेलगाव नाका, बीड - 2 लाख
 • - एकूण - 10 कोटी 93 लाख

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2014 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close