S M L

सीएमपदाच्या शर्यतीत नसल्याचं गडकरींनी पुन्हा केलं स्पष्ट

Samruddha Bhambure | Updated On: Oct 23, 2014 02:45 PM IST

सीएमपदाच्या शर्यतीत नसल्याचं गडकरींनी पुन्हा केलं स्पष्ट

23 ऑक्टोबर :  राज्यात सध्या दिवाळीसोबतच मुख्यमंत्री कोण याची जोरदार चर्चा सुरू असताना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दिवाळीनिमित्त ही भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत असले, तरी मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेशी याचा संबंध लावण्यात येत आहे. अखेर गडकरींनी आपण या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. गडकरींना भेटण्यासाठी नागपूरमध्ये आमदार गेले त्यावेळेस फडणवीस उपस्थित नव्हते, त्यामुळे खूप चर्चा रंगली होती.

गडकरी म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसून, माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही. राज्यात पुन्हा माझी येण्याची इच्छा नसल्याचे सांगताना मला दु:ख होत आहे. दिल्लीमध्ये मी खूश आहे. महाराष्ट्रात येण्याची माझी कोणतीही योजना नाही. फडणवीस यांना मीच राजकारणात आणल्याने आम्ही प्रतिस्पर्धी नसून एकमेकांचे सहयोगी आहोत, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, नितीन गडकरींना मुख्यमंत्री करा अशी मागणी करणार्‍या आमदारांना पक्षानं समज देणार असल्याची माहिती सूत्रांनी IBN लोकमतला दिली आहे. गडकरींना मुख्यमंत्री करा अशी मागणी विदर्भातल्या 40 आमदारांनी केली होती. तसंच त्यांच्यासाठी तीन आमदारांनी जागा रिकामी करण्याची तयारीही दाखवली होती. परस्पर भूमिका जाहीर करू नका, अशा घटनांमुळे नवे वाद निर्माण होतात. त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होतो त्यामुळं नवे वाद आणि गोंधळ टाळण्यासाठी पक्षानं अशी समज दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2014 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close