S M L

ठरलं !, 31 ऑक्टोबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2014 06:27 PM IST

ठरलं !, 31 ऑक्टोबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

27 ऑक्टोबर : कोण होणार मुख्यमंत्री ? याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचं नाव अजून निश्चित झालं नाही मात्र नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 31 तारखेला दुपारी 4 वाजेचा मुहूर्त ठरला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहे अशी माहिती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिलीये.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 123 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही.त्यामुळे भाजपला बहुमतासाठी शिवसेनेला सोबत घेण्यासाठी तयारी सुरू केलीये. पण दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होणार ? या वरुन बरीच चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय. त्यामुळे उद्या मंगळवारी  भाजपच्या नेता निवडीसाठी बैठक होत आहे. पक्षाकडुन मिळालेल्या आदेशानंतर भाजपचे आमदार, खासदार मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी असणारी स्पर्धा पाहता आमदारांची नेत्यांकडे होणाऱ्या उठबशीकडे विशेष लक्ष असणार आहे. आज पक्षाचे निरीक्षक राजनाथ सिंग आणि जे.पी.नड्डा मुंबईत दाखल होत आहेत. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो आणि यानंतर काय पडसाद उमटतील याची जाणीव ठेवून भाजपने तीन दिवसांनंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबईतील वानखेडे स्टेडियम आयोजित केला आहे. पण मुख्यमंत्र्यांसोबत आणखी कोणते नेते शपथ घेणार हे मात्र अजूनही गुलदस्त्याच आहे. या शपथविधीला देशातील आणि राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींही या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. 31 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा जाहीर झाल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2014 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close