S M L

मुख्यमंत्री कोण ? आणि भाजप कुणासोबत जाणार ?

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2014 12:55 PM IST

मुख्यमंत्री कोण ? आणि भाजप कुणासोबत जाणार ?

27 ऑक्टोबर : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल हे मंगळवारी जाहीर होईल आणि नव्या सरकारचा 31 तारखेला शपथविधी होणार हे आता निश्चित झालंय. पण सरकार स्थापनेसाठी भाजप कुणासोबत जाणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजप नेते उत्सुक आहे तर राष्ट्रवादीनेही पाठिंबा देण्याची अगोदरच तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण आणि पाठिंबा कुणाचा हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे.

महाराष्ट्रात तब्बल 15 वर्षांनंतर सत्तांतर होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 123 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला पण बहुमतचा आकडा गाठता आला नाही. आता सरकार स्थापनेसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण ? यासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आहे. त्यासाठी राजनाथ सिंह आणि भाजपचे प्रभारी जे. पी. नड्डा येणार आहेत. यात विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. पण अजुनही शिवसेना भाजपला पाठिंबा देणार का यावर चर्चेच गुर्‍हाळ अजुनही सुरूच आहे. आधी मनं मिळाली पाहिजेत नंतर एकत्र येवू असं भाजप नेते वारंवार सांगत आहेत. पण सरकार बनवण्यासाठी दोन दिवस राहिले असताना ही मनं केव्हा जुळणार असा सवाल आता विचारला जातोय. शिवसेना पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहे. पण तो पाठिंबा विनाअट असावा असं भाजपला वाटतंय. तर विनाअट पाठिंबा कसा द्यायचा असा प्रश्न सेनेसमोर निर्माण झालाय. त्यातंच राष्ट्रवादीनं पाठिंबा जाहीर केल्यानं भाजप बिनधास्त आहे. तर जुन्या मित्राच्या जीवाची आता घालमेल सुरू झालीये.

 सेना नरमली

भाजपबाबत सेनेची भूमिका आता नरम झाल्याची चिन्ह दिसत आहे. जनतेची इच्छा असेल, तर सेना-भाजप एकत्र येतील, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकते, मनं जुळू शकतात तर भाजप आणि शिवसेना तर 25 वर्षं एकत्र आहोत असंही ते म्हणाले. राज्यात भाजपनं कुणाचीही मुख्यमंत्रीपदी निवड केली तरी शिवसेनेची त्याला साथ असेल असं असं आज सामनाच्या अग्रलेखात स्पष्ट करण्यात आलंय

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय ?

'मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय भाजपचे दिल्लीतील हायकमांडच घेणार असल्याने राज्यातील नेत्यांनी डोकेफोडी करून तरी काय उपयोग ? राज्यात भाजपच्या जागा वाढल्या आणि ते बहुमताच्या जवळ पोहोचले ते केवळ मोदी-शहा यांच्यामुळेच.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घोटाळेबाजांना सत्ता मिळण्यापेक्षा भाजपला ती मिळतेय यातच राज्याचे हित आहे. राज्यात गडकरी, फडणवीस, जावडेकर, तावडे, खडसे, पंकजा मुंडे की आणखी कोणी, हे दिल्लीवालेच ठरवतील. अनुभवी गडकरींकडे विकासाचे व्हिजन आहे तर प्रत्यक्ष मंत्रिपदाचा अनुभव नसलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे विधिमंडळातला दांडगा अनुभव आहे. जनतेच्या आशीर्वादाचे सोने करून महाराष्ट्राचा रथ पुढे नेणारा कोणीही असू द्या, शिवसेना हिमतीने आणि हिकमतीने त्यास साथ देईल.'

 काही प्रश्न उपस्थित

- भाजप-शिवसेनेचं गाडं नेमकं अडलं कुठं?

- शिवसेनेचा प्रस्ताव काय आहे?

- शिवसेनेला जास्त वाटा पाहिजे का?

- भाजपची भीस्त कुणावर?

पवारांची गुगली

विधानसभेत सरकारच्या बहुमतासाठी मतदान झालं तर राष्ट्रवादी गैरहजर राहील असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट करुन गुगली टाकलीये. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी ही भूमिका स्पष्ट केली. राज्यात स्थिर सरकार बघायला आवडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार म्हणतात, "आमचा भाजपला पाठिंबाही नाही आणि विरोधही नाही. परिस्थिती आली आणि विधिमंडळात बहुमतासाठी मतदान झालं तर आम्ही अनुपस्थित राहू. सध्याचं संख्याबळ पाहता, आम्हाला हे करणं भाग आहे. नाहीतर महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकणार नाही आणि 6 महिन्यांत पुन्हा निवडणुका होतील. आम्हाला राज्यात स्थिर सरकार पहायचं आहे. पण सध्यातरी भाजप आणि शिवसेना सरकार स्थापनेसाठी एकत्र येताना दिसत नाहीत."

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2014 10:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close