S M L

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार का? शिवसेनेचा भाजपला सवाल

Samruddha Bhambure | Updated On: Oct 30, 2014 04:30 PM IST

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार का? शिवसेनेचा भाजपला सवाल

29 ऑक्टोबर :  एकीकडे भाजपशी पुन्हा युती करण्यावरून शिवसेनेत विचारमंथन होत असतानाच, भाजप आता राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत सेनेने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

'विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्रानं कवटाळला' असं सामनाच्या आजच्या अग्रलेखाचं शीर्षक आहे. ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस आलेत, त्या विदर्भात राष्ट्रवादीनं सिंचन घोटाळे करून ठेवलेत. आता त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवलं जाणार का असा सवाल या अग्रलेखात विचारला आहे.

शरद पवार यांनी फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय? महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व काँग्रेसमुक्त करण्याचे वचन देऊन आपण सत्तेवर आला आहात आणि ज्या विदर्भातून आपण आला आहात त्याच विदर्भात जलसिंचनाचे मोठे घोटाळे राष्ट्रवादीवाल्यांनी करून ठेवले आहेत. त्यामुळे देवेंद्र सरकारच्या पावित्र्याचा प्रश्न सुरुवातीपासूनच निर्माण झाल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आहे ते भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीला कायमचे गाडण्यासाठी; पण त्याच राष्ट्रवादीने पहिल्याच दिवशी पाठिंब्याचा खेळ करून दूध नासवण्याचा प्रयत्न केला. हे नासके दूध नव्या सरकारला बाळसे देणार असेल तर हा विषय फार न लांबवता इथेच पूर्णविराम दिलेला बरा असंही या अग्रलेखात म्हटलं आहे. मात्र राज्य स्थिर असावे व स्थिर राज्याचा मुख्यमंत्री स्थिर असावा, अशी अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2014 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close