S M L

मुख्यमंत्री लागले कामाला, सेवा विधेयकाची केली घोषणा

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2014 09:03 PM IST

मुख्यमंत्री लागले कामाला, सेवा विधेयकाची केली घोषणा

31 ऑक्टोबर : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच कामाला लागले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी आज (शुक्रवारी) संध्याकाळी आपली पहिलीवहिली पत्रकार परिषद घेतली आणि राज्यात सेवा हमी विधेयक आणणार अशी महत्वपूर्ण घोषणा केली. सरकारकडून सेवा कशाप्रकारे दिल्या जातात याची माहिती या विधेयकाच्या मार्फत दिली जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच राज्याची परिस्थिती समाधानकारक नाही पण ती सुधारण्याची आणि महाराष्ट्राला नंबर वन करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पहिल्यांदाच राज्यात भाजप सरकार सत्तेवर विराजमान झालंय. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 10 जणांच्या छोटेखानी मंत्रिमंडळानेही शपथ घेतली. मान्यवरांच्या शुभेच्छा, अभिनंदन स्वीकारल्यानंतर फडणवीस तातडीने कामाला लागले. मंत्रालयात या नव्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यानंतर फडणवीस यांनी विधिमंडळ वार्ताहार संघात पत्रकारांशी वार्तालाप केला.

इतकी वर्ष पत्रकार परिषदा घेतल्यात पण कधी दडपण वाटलं नाही आता मात्र दडपण वाटत आहे अपेक्षांचं ओझं नक्की आहे असं सांगत फडणवीस यांनी वार्तालापाला सुरुवात केली. लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. आम्ही जी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण करणार आणि महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य करून दाखवणार असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसंच राज्यात सरकारकडून कोणकोणत्या सेवा कशाप्रकारे दिल्या जातात याची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी सेवा हमी विधेयक आणणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

या विधेयकामुळे कारभारात पारदर्शकता यावी यासाठी हे पाऊल उचलले आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती महिन्याभरात या विधेयका मसुदा तयार करेल. त्यानंतर जनतेच्या सुचना मागवण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. आघाडी सरकारने अनेक घोषणा केल्यात. पण सध्या सरकारची आर्थिक स्थिती समाधानकारक नाही. ज्या योजना केवळ कागदावरच अशा सर्व योजनांचा आढावा घेण्यात येईल. आम्ही ज्या घोषणा केल्या त्यावर उद्यापासून काम सुरू करणार आहोत. मागास भागात जो विकासाचा असमतोल आहे तो दूर करण ही प्राथमिकता आहे. आमचं लक्ष विकास कामांवर आहे पण राज्याची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी थोडा वेळ लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे स्पष्ट करत असतांना राज्याच्या हितासाठी जिथे कारवाई करण्याची आवश्यक भासेल तिथे कडक पाऊल उचलावी लागणार असा इशाराही फडणवीस यांनी दिला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मी स्वत: शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित रहाण्यासाठी फोन केला होता. त्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. शिवसेना सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबद्दल सध्या शिवसेनेशी सकारात्मक चर्चा सुरू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला पत्रकारांच्या पेन्शन योजनेचाही विचार करणार असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2014 09:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close