S M L

दहीहंडीत 18 वर्षांखालील गोविंदांवर बंदीच - सुप्रीम कोर्ट

Samruddha Bhambure | Updated On: Nov 4, 2014 02:47 PM IST

supreme court and dahi handi

04 नोव्हेंबर : दहीहंडीवर मुंबई हायकोर्टाने घातलेल्या निर्बंधांना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने निरर्थक ठरवत निकाली काढली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा जास्त असू नये तसेच 18 वर्षांखालील मुलांना थरावर चढण्यास मनाई करणार्‍या मुंबई हायकोर्टाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीमध्ये थरांचा थरार, लाखोंच्या बक्षिसांची लयलूट आणि गोविंदांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत अनेक गोविंदा पथकांमधील तरुणांनी आपला जीव गमवलाय तर काही गोविंदांना कायमचे अपंगत्वही आलं आहे. या स्पर्धेला लगाम लावण्यासाठी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना मुंबई हायकोर्टाने दहीहंडीतील उंचीची स्पर्धा आणि बालगोविंदांवर निर्बंध घातले होते. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होणार्‍या दहीहंडीच्या उत्सवामध्ये 18 वर्षांखालील गोविंदांना सहभागी होता येणार नाही. शिवाय 20 फुटांपेक्षा जास्त उंचीची हंडीही बांधता येणार नाही. तसंच थरांमध्ये सहभागी होणार्‍या गोविंदांचे नाव, पत्ता, वयाचा दाखला, फोटो ही माहितीही उत्सवाच्या किमान 15 दिवस आधी सादर करावी लागेल. इतकंच नाही तर बालहक्क आयोगाने घालून दिलेल्या सर्व अटींचं पालन गोविंदा पथक आणि दहीहंडी आयोजकांना करावं लागणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2014 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close