S M L

आम्ही राज ठाकरेंसोबत, मनसेसैनिकांचं 'कृष्णकुंज'वर शक्तिप्रदर्शन

Sachin Salve | Updated On: Nov 10, 2014 06:13 PM IST

आम्ही राज ठाकरेंसोबत, मनसेसैनिकांचं 'कृष्णकुंज'वर शक्तिप्रदर्शन

mns_krushnakunj10 नोव्हेंबर : एकीकडे सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू आहे, पण सत्तेचं स्वप्न भंगल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरहात बुडाली आहे. अशा नाजूक परिस्थिती मनसेत पडझडही सुरू झालीये. पण ज्यांच्या करिश्म्यावर आजपर्यंत भरारी घेतली ते पक्षाध्यक्ष राज ठाकरेंसोबत आम्ही आहोत असं सांगण्यासाठी राज्यभरातून मनसैनिक 'कृष्णकुंज'वर एकवटले आहेत.

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. मराठीचा मुद्या, टोल आंदोलन, नोकर्‍यांमध्ये मराठी मुलांची भरती या मुद्दांवरून मनसेने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच मुसंडी मारली. त्याबळावर मनसेनं आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत दमदार एंट्री करत 13 आमदार निवडून आले. पण गेल्या आठ वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लोकसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. आणि विधानसभेत सर्व दिग्गज नेते पराभूत झाले. फक्त जुन्नरच्या मतदारसंघातून एकच आमदार निवडुन आला. पक्षाला आलेल्या दारूण पराभवानंतर मात्र मनसेत राजीनामानाट्य सुरू झालं. नाशिकसह राज्यभरातील पदाधिकारी आमदारांनी राजीनामे देऊ केले. 'अशा परिस्थितीत कोण-कोण आपल्या सोबत आहे हे कळेल' असं सांगत राज यांनी सर्वांचे राजीनामे स्वीकारले. पण आम्ही राज यांच्यासोबतच आहोत असं सांगण्यासाठी राज्यभरातील मनसेसैनिकांनी राज यांच्या मुंबईतील निवासस्थानी 'कृष्णकुंज'वर जमण्याचे ठरवले. या महिन्याच्या 1 तारखेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजवर जमण्याचे ठरवले होते. पण राज ठाकरे पाथर्डी दौर्‍यावर रवाना झाल्यामुळे हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. अखेर आज सोमवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या ठिकाणांहून मनसेसैनिकांनी कृष्णकुंजवर एकच गर्दी केली. हातात मनसेचे झेंडे घेऊन 'राज ठाकरे हम तुम्हारे साथ है'घोषणाबाजी करून कार्यकर्त्यानी परिसर दणाणून सोडला. राज ठाकरे यांनी दुपारी बाहेर येऊन कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. प्रमुख नेत्यांशी त्यांनी चर्चाही केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2014 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close