S M L

उंदरांच्या पाठिंब्यावर राज्य चालवणार का ?-शिवसेना

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 12:35 PM IST

uddhav_on_bjp_6nov12 नोव्हेंबर : जनतेने नाकारलेल्यांच्या पाठिंब्यावर तुम्ही सरकार कसे चालवणार ?, महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड तुम्ही महाराष्ट्राची तिजोरी कुरतडणार्‍या उंदरांच्या पाठिंब्यावर करणार काय ? विश्‍वासदर्शक ठरावदेखील त्याच उंदरांच्या मदतीने जिंकणार आहात का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेनेनं भाजपवर विखारी टीका केली. या उंदरांच्या मदतीने महाराष्ट्राला तुम्ही कुठे नेऊन ठेवणार आहात असा खोचक टोलाही सेनेनं लगावलाय.

विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेण्यात आला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केलीये. राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही मागितला नव्हता, त्यांनी स्वता:हून दिलेल्या पाठिंब्याशी आणि त्यांच्या भूमिकेशी भाजपला काही देणेघेणे नाही असं म्हणणार्‍या मुख्यमंत्र्यांची बाजू जरी बरोबर असली तरी समर्थन लंगडे आहे. विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजपचे सरकार कसे तरणार? भाजपला आपले सरकार वाचविण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा चालेल, पण शिवसेनेला सरकारात सामील करून घेण्याबाबत चर्चेची गाडी ते पुढे ढकलायला तयार नाहीत. नैतिकतेच्या आणि तात्त्विक मुद्यांवर शिवसेनेने पाठिंबा द्यावा असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. हे नैतिक आणि तात्त्विक मुद्दे नेमके कोणते हे स्पष्ट करावे असा सवाल उद्धव यांनी केला. तसंच राष्ट्रवादी हा महाराष्ट्रात आज चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. जनतेने निवडून दिलेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष चौथ्या म्हणजे शेवटच्या क्रमांकाच्या पक्षाशी हातमिळवणी करून सरकार वाचवीत आहे. राष्ट्रवादीस राज्याच्या जनतेने चौथ्या क्रमांकावर का फेकले? व अशा केरात टाकलेल्या पक्षाची धूळ मस्तकी लावून सरकार कोणती नैतिकता व तत्त्व तेजोमय करणार आहे असा खडा सवालही उपस्थित करण्यात आलाय.

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे

- उंदरांच्या पाठिंब्यावर सरकार तरेल का ?

- राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबतचे मुख्यमंत्र्यांचे समर्थन लंगडे

- बहुमतासाठी भाजपला नाना खटपटी कराव्या लागतील

- भाजपला सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे

- मात्र सरकारमध्ये सेनेला सामिल करून घेण्यासाठी ते चर्चेची गाडी पुढं ढकलायला ते तयार नाहीत

- नैतिकतेच्या मुद्यावर शिवसेनेला समर्थन मागता ?, ही कुठली नैतिकता ते जनतेला सांगा

- सरकार वाचवण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीच्या तालावर नाचणार का

- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराशी भाजपला देणं घेणं नाही

- केरात टाकलेल्या पक्षाची धुळ भाजप मस्तकी लावणार का ? - सेनेचा भाजपला सवाल

- सरकार वाचवण्यासाठी भाजप एमआयएमचा पाठिंबाही घेऊ शकते

- राष्ट्रवादीसारख्या उंदराच्या मदतीनं महाराष्ट्राला कुठे नेवून ठेवणार

- संसदेत पाकिस्तान झिंदाबाद आणि विधानसभेत जय विदर्भ असे नारे देणे हा अपराध

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close