S M L

भाजपचं मिशन '145' फत्ते, विश्वासदर्शक परीक्षेत पास

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 04:42 PM IST

भाजपचं मिशन '145' फत्ते, विश्वासदर्शक परीक्षेत पास

12 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 'आवाज कुणाचा' दाखवत अखेर मिशन 145 फत्ते केले आहे. फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा आज पास केलीये. विधानसभेत अभुतपूर्व गोंधळात आवाजी मतदानाने भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला आणि त्यावर अध्यक्षांनी आवाजी मतदान घेत लगेल मंजूरही दिली. त्यामुळे आता फडणवीस सरकार अधिकृतपणे सत्तेवर विराजमान झाले असून पुढील सहा महिने सरकार चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव सादर करायचा होता. सकाळच्या पहिल्या सत्रात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बागडे यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर विश्वासदर्शक ठराव सादर करण्याची घोषणा केली. अध्यक्षांच्या या घोषणेमुळे शिवसेना आणि काँग्रेसने एकच गोंधळ घातला. पण, या गोंधळातच आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव सादर केला. शिवसेनेनं मतविभाजनाची मागणी केली पण तीही अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यामुळे सेना आमदार आणखी संतापले. त्यातच अध्यक्षांनी शेलार यांच्या ठरावावर आवाजी मतदान घेऊन मंजुरीही देऊन टाकली आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. अध्यक्षांच्या मंजुरीनंतर आता फडणवीस सरकार सत्तेवर खर्‍या अर्थाने विराजमान झाले आहे. पुढील सहा महिने सरकारला काम करण्यास मुभा मिळाली आहे. पण भाजपला पाठिंबा कुणी दिला हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. राष्ट्रवादीने आपल्याला पाठिंबा दिला हे जाहीर होऊ नये यासाठी भाजपने आवाजी मतदानाची खेळी खेळली अशी चर्चा आहे. अध्यक्षांनी मतदान न घेता आवाजी मतदान घेऊन लोकशाहीचा खून केला अशी जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली. अध्यक्षांच्या कार्यपद्धतीविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तर अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी नियमबाह्य काम केलं, त्यांचा आम्ही धिक्कार करतो. नियमांप्रमाणे मतदान झालं पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडा असं जाहीर आव्हान सेनेचे नेते रामदास कदम यांनी दिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close