S M L

विधानभवनात रणकंदन; काँग्रेसचा ठिय्या तर सेनेची घोषणाबाजी

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 06:46 PM IST

विधानभवनात रणकंदन; काँग्रेसचा ठिय्या तर सेनेची घोषणाबाजी

12 नोव्हेंबर : भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनात विश्वासदर्शक ठरावावरुन चांगलेच रणकंदन घातले. आजपर्यंत सत्तेत असणारे काँग्रेसचे नेते आज ठिय्या आंदोलन करण्यासाठी पायर्‍यांवर पाहण्यास मिळाले. सेना आमदारांनी राज्यपालांची गाडी अडवली आणि त्यांचं भाषण सुरू असतांना सभागृहात जोरदार घोषणाबाजीही केली. पण या सगळ्या राड्यात राष्ट्रवादीचे आमदार सहभागी झाले नाही हे विशेष.

भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला पण या ठरावावर शिवसेना आणि काँग्रेसने कडाडून विरोध केलाय. काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यावर ठिय्या आंदोलन केलं. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यास अनेक नेते, आमदार ठिय्या आंदोलनात पाहण्यास मिळाले. गेली पंधरा वर्ष ठिय्या आंदोलन करताना भाजप आणि शिवसेनेचे आमदार पाहण्यास मिळायचे. पण आज हे चित्र उलटं पाहण्यास मिळाल्याने सर्वांचा नजरा काँग्रेस नेत्यांवर खिळल्या.

तर शिवसेनेच्या आमदारांनी भवनाच्या परिसरात भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. राज्यपाल विद्यासागर राव अभिभाषणासाठी विधानभवनाच्या गेटवर पोहचले असता त्यांनी गाडी सेना आमदारांनी अडवली. यावेळी काँग्रेसचे आमदारही यात सहभागी झाले. 'राज्यपाल चले,जावं चले जावं'अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आमदारांच्या गराड्यातून सुटका केल्यानंतर मुख्य सभागृहात राज्यपालांच्या भाषणाला सुरुवात झाली. मात्र भाषणादरम्यानही सेनेच्या आमदारांनी जोरदार घोषणबाजी केली. तर काँग्रेसच्या नेत्यांनी निषेध नोंदवत सभात्याग केला. विशेष म्हणजे भाजपने कुणाचा पाठिंबा घेतला हे मात्र कळू शकलं नसलं तरी या सगळ्या वादात राष्ट्रवादीचे आमदार शांतपणे हा सगळा प्रकार पाहत आहे. राष्ट्रवादीचे आमदार या राड्यात कुठेही दिसले नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 06:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close