S M L

काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणावा, बहुमत सिद्ध करून दाखवू -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2014 11:48 PM IST

devendra_fadanvis_nagpur_pc12 नोव्हेंबर : आमच्याकडे पूर्ण बहुमत आहेत. त्यामुळेच आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकला जर काँग्रेसला इतकाच जर संशय असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही त्या प्रस्तावावर विश्वासदर्शक प्रस्ताव पुन्हा जिंकून दाखवू असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला दिलं. मतविभाजनाची मागणी उचित वेळी कुठल्याही पक्षानं केली नाही. त्यामुळे नियमाप्रमाणेच प्रस्ताव मंजूर झाला असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली होती. त्याबद्दल त्यांनी निर्णय घेतला अशी सावध प्रतिक्रियाही फडणवीस यांनी दिली.

फडणवीस सरकार आज विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा पास झालं. विधानसभेत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्यावर आवाजी मतदान घेण्यात आले. आवाजी मतदानानंतर ठरावाला मंजुरीही देण्यात आली. मात्र, भाजपच्या ठरावावर काँग्रेस आणि शिवसेनेनं आक्षेप घेतला. अध्यक्षांनी नियमांची पायमल्ली करून ठराव मंजूर केला. आजचा दिवस हा विधानसभेसाठी काळा दिवस ठरला अशी जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिली. तर तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा प्रस्ताव सादर करा असं आव्हानच सेनेच्या नेत्यांनी दिलं. पण हा प्रस्ताव नियमांप्रमाणेच मांडण्यात आला असा दावा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठराव नियमांप्रमाणेच मंजूर झालाय. जेव्हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तेव्हा मतविभाजनाची मागणी उचित वेळी कुठल्याही पक्षानं केली नाही. एकदा प्रस्ताव मंजूर झाल्यावर पुन्हा मतदान घेता येत नाही. यापूर्वीही विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर झालाय. आमच्याकडे बहुमत होते म्हणून आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकला असा दावा फडणवीस यांनी केला. जर आमच्या विरोधात शंका असल्यास काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणावा आम्ही विश्वासमत सिद्ध करून दाखवू असं आव्हानही फडणवीस यांनी काँग्रेसला दिलं. तसंच पहिल्याच दिवशी कोणत्याही आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ नये असं आम्हाला वाटतं होतं. पण काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपालांना धक्काबुक्की केली ही घटना अत्यंत लाजिरवाणी होती. काँग्रेसच्या आमदारांचं कृत्य हे विधानसभेला काळीमा फासणार आहे त्यामुळे कारवाई करावी लागली असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2014 10:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close