S M L

अवकाळी तडाखा!, राज्यात ठिकठिकाणी पावसाचा पिकांना बसतोय फटका

Samruddha Bhambure | Updated On: Nov 16, 2014 06:04 PM IST

अवकाळी तडाखा!, राज्यात ठिकठिकाणी पावसाचा पिकांना बसतोय फटका

 16 नोव्हेंबर :  पावसाळय़ाच्या चार महिन्यांत राज्यातील अनेक भागांत झालेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाचा हंगाम वाया गेला असतानाच आता अवकाळी पावसाच्या तडाख्यात रब्बीच्या पिकांवर संकट निर्माण केले आहे. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झालं आहे. याशिवाय ढगाळ वातावरणामुळे उभ्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. राज्याच्या कृषी विभागाने मात्र, या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाला फायदा होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

यंदा बहुतांश भागांत ऑगस्ट, सप्टेंबर तसंच ऑक्टोबर महिन्यात पावसाने विशेष हजेरी लावली नाही. त्यामुळे संपूर्ण मराठवाडयासह राज्यात दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत. दुष्काळी भागातील शेतीला या पावसामुळे संजीवनी मिळाली असली तरी अन्यत्र मात्र अवकाळी पावसाचा विपरित परिणाम पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यात कोरडवाहू भागात पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे तर बागायत भागात डाळींब आणि द्राक्षांच्या पिकांचं नुकसान केलं आहे. जिरायत भागात या पावसामुळे पाण्याला आलेल्या रब्बी हंगामातल्या ज्वारी, हरबरा, मका, गुलछडी, गहू , उस याबरोबर भाजीपाल्याच्या पिकांना जीवदान मिळालं आहे.

लातूरमध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. भर पावसाळ्यात मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सोयाबीनचा पेरा पावसाने चुकवला होता त्यामुळे आता पाऊस पडल्यानं हरभर्‍याचा पेरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

राज्यात एकीकडे शेतीच्या नुकसानाचं सावट आहे, तर दुसरीकडे डेंग्युनं सगळीकडं धुमाकुळ घातला आहे. त्यात आता पावसाच्या हजेरीमुळे आजार वाढण्याची शक्यता आहे. सर्दी, खोकला आणि घश्यांचे प्रॉबलेम्स यानं नागरिक सध्या हैराण आहेत. नोव्हेंबरचा अर्धा महिना उलटून गेलाय मात्र थंडीचा पत्ताच नाही. अरबी समुद्रात लक्षद्वीपपासून ते दक्षिण गुजरातच्या किनार्‍यालगत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र तसेच, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवसांतही राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजे पुढील आठवडय़ातही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरी असे वातावरण असेल. त्यामुळे थंडीच्या आगमनासही विलंब होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2014 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close